Christmas Days: मराठी नाव असलेले पुण्यातील ‘ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 05:04 PM2021-12-24T17:04:26+5:302021-12-24T17:05:56+5:30
चर्च जरी कसबा पेठमधले असले तरीही चर्चच्या मंडळींमध्ये कसबा पेठेतील एकही सभासद नाही
तन्मय ठोंबरे
पुणे : शहरातील मध्यवर्ती असलेल्या कसबा पेठेतील महाराष्ट्रीयन लोकांनी या चर्चची स्थापना १९६७ साली केली. ॲड. रेव्ह. वसंतराव लोंढे, रेव्ह. डी. जी. काळे, एस.डी. पाडळे, एल.बनसोडे, वि. शिंदे, नीळकंठराव मकासरे, व्ही. पवार आणि एस. समुद्रे या महाराष्ट्रीयन लोकांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. चर्चच्या बांधणीपूर्वी ही जागा स्कॉटिश मिशनची होती आणि तिथे एक शाळा होती. नंतर ही जागा घेऊन इथे चर्चची बांधणी झाली.
चर्चची इमारत पारंपरिक घटनेनुसार असून गॉथिक कमानी आणि पूर्णपणे दगड, चुण्याने तयार केली आहे. इमारत एल आकारामध्ये दिसून येते. चर्चमध्ये जुन्या पद्धतीचे बाकडे आहेत. चर्च जरी कसबा पेठमधले असले तरीही चर्चच्या मंडळींमध्ये कसबा पेठेतील एकही सभासद नाही.महाराष्ट्रीयन लोकांनी हे चर्च स्थापन केले असून, त्याला ब्रदर देशपांडे असा नाव देण्यात आले. बहुदा चर्चला पहिल्यांदाच मराठी नाव दिले गेले असेल.
पेशव्यांच्या काळात या चर्चची पहिली इमारत बांधली गेली, अशी माहिती चर्चचे सचिव सुनील भंडारी आणि सहसचिव नोवेल देठे यांनी दिली. चर्चचे पहिले धर्मगुरू रेव्ह. एस. एल. साळवी आणि डी. जी. काळे होते. चर्चमध्ये दररोज पाच वाजता प्रार्थना होते. लहान-मुलांसाठी संडे स्कूल, तरुणांचा संघ, महिलांसाठी स्नेहमेळावे आहेत. तसेच लोकांचे अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शनदेखील केले जाते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाती. चर्चचे सध्या असलेले कार्यरत धर्मगुरू रेव्ह. पराग लोंढे असून ही माहिती त्यांनी दिली.