भावासह पुतण्याला पेट्रोल टाकून पेटवले

By admin | Published: February 6, 2015 11:31 PM2015-02-06T23:31:51+5:302015-02-06T23:31:51+5:30

जमीनीच्या वादातून सख्ख्या भावासह पुतण्याला पेट्रोल-डिझेल टाकून पेटवून दिल्याचा धक्कदायक प्रकार बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे घडला.

With brother, he lit petrol on petrol | भावासह पुतण्याला पेट्रोल टाकून पेटवले

भावासह पुतण्याला पेट्रोल टाकून पेटवले

Next

बारामती : जमीनीच्या वादातून सख्ख्या भावासह पुतण्याला पेट्रोल-डिझेल टाकून पेटवून दिल्याचा धक्कदायक प्रकार बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे घडला. शुक्रवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात दोघे जण गंभीर जखमी असून, पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे आरोपी सैन्यदलात नोकरीस आहे.
जहांगीर नसीर मुलाणी (वय ३४), रोझम मुलाणी (वय १३) हे गंभीररीत्या भाजले आहेत. घर पूर्णपणे जळाले.
तंटामुक्त समितीच्या माध्यमातून हा वाद मिटला होता. मात्र, शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोघा भावांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून मारहाण केल्याचा राग मनात धरून आरोपी शौकत मुलाणी याने हा प्रकार केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपी शौकत हा भारतीय सैन्यदलात नोकरीस आहे. त्याची सुट्टी संपली आहे. त्यामुळे तो उद्या (दि. ७) जाणार होता. मात्र, वाद मिटविताना भावाने केलेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केले. दोघा भावांच्या वादात १३ वर्षांचा रोझम हा शालेय विद्यार्थी गंभीररीत्या भाजला आहे.
गुरुवारी (दि. ५) गावातील प्रमुखांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, रात्री अचानक आरोपी शौकत याने गाढ झोपेत असताना जहांगीर मुलाणी यांच्या घरी जाऊन खिडकीतून जहांगीर व रोझम यांच्या अंगावर पेट्रोल-डिझेल ओतून त्यांना पेटवून दिले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी भेट देऊन माहिती घेतली. कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ग्रामस्थांच्या पुढे मारहाण केल्याचा राग मनात धरून शौकत याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. पुणे येथे जबाब घेतल्यानंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)

४या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तसेच, अंगणातील ३ शेळ्यांचाही भाजून मृत्यू झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र आग आटोक्यात येत नव्हती, त्यामुळे अखेरला बारामती नगरपालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी बोलावण्यात आली होती.
४अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून घरातील स्वयंपाकाचा भरलेला गॅस सिलिंडर बाहेर काढला. आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीत जहांगी इर मुलाणी यांच्या अनेक संसारोपयोगी वस्तू, कपडे, धान्य आदी जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जहांगीर नसीर मुलाणी, शौकत नसीर मुलाणी या दोघा भावंडांचा वडिलोपार्जित जमिनीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. त्या वादातून सतत कुरबुर सुरू होती. त्यांच्यामध्ये समझोता घडवून आणण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला. अनेकदा किरकोळ स्वरूपाची भांडणे सुरू होती.

 

Web Title: With brother, he lit petrol on petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.