मेहुण्यानेच केला बहिणीच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 05:14 PM2018-09-19T17:14:41+5:302018-09-19T17:24:29+5:30
बहिणीवर संशय घेतो, या कारणावरुन मेहुण्याने दोन साथीदारांच्या मदतीने तिच्या पतीवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला़.
पुणे : बहिणीवर संशय घेतो, या कारणावरुन मेहुण्याने दोन साथीदारांच्या मदतीने तिच्या पतीवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला़. या घटनेत आशिष बसवंत तडवळकर (वय२६, रा़. सदानंद हाईटस, शंकरनगर, आंबेगाव, कात्रज) हे गंभीर जखमी झाले आहेत़.
भारती विद्यापीठ पोलिसांनी तडवळकर यांचा मेहुणा अमित दीपक आरडे (वय २६, रा़. मार्तंड हाईटस, सहकारनगर) व अमोल वेनपूरे या दोघांना अटक केली आहे़. लखन जगताप हा पळून गेला आहे़. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथील सच्चाईमाता मंदिराशेजारील पाण्याच्या टाकीजवळ घडली़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आशिष तडवळकर हा चालक म्हणून काम करतो़. त्याचा अमित आरडे याच्या बहिणीशी प्रेमविवाह झाला आहे़. त्यांना दोन लहान मुले आहेत़ गेल्या काही दिवसांपासून आशिषची पत्नी सारखी मोबाईलवर बोलत असते़ यावरुन त्यांच्यात वारंवार भांडणे होऊ लागली होती़. मोबाईलवर इतक्या वेळ कोणाशी बोलते, असे विचारुन आशिष तिच्यावर संशय घेऊ लागला होता़ त्यावरुन त्यांच्या वाद झाल्याचे दहा दिवसांपूर्वी ती माहेरी निघून गेली होती़.
तेव्हा मंगळवारी दुपारी अमित आरडे हा अमोल वेनपूरे, लखन जगताप यांना घेऊन सच्चाईमाता मंदिराजवळील पाण्याच्या टाकीवर गेले़. तेथून अमोल वायेकर याने आशिष याला फोन लावला व तुझा मेहुणा अमित हा त्याचे मित्रासोबत आला आहे़. तू तेथे ये असे सांगितले़. त्यानुसार आशिष तेथे गेला़ तेव्हा दोघांनी त्याला हाताने मारहाण केली़ अमित आरडे याने दुचाकीच्या डिकीतून कोयते काढले़. त्याने प्रथम आशिष यांच्या डोक्यात कोयता मारला़. त्यानंतर अमोल वेनपूरे याने त्याला कोयत्याने मारण्यास सुरुवात केली असता त्याचा वार चुकला व आशिष याच्या डाव्या हातावर वार बसला़. लखन जगताप याने पाठीवर वार केला व ते पळून गेले़.
आशिष तडवळकर याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़. या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक डी़. आऱ. मदने अधिक तपास करीत आहेत़.