जमिनीच्या मोहापायी सख्ख्या भावाचा काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:31 AM2018-05-08T02:31:23+5:302018-05-08T02:31:23+5:30

वडिलोपार्जित शेतजमिनीच्या भांडणाच्या कारणावरून मेहुण्याच्या सांगण्यावरून कट रचून भावाने आपल्या दोन मुलांच्या सहाय्याने सख्ख्या भावाचा लाकडी दांडके व टिकावाने मारून निर्घृणपणे खून केल्याची घटना भांबोरा, यमाईनगर, (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे घडली.

brother Murder News | जमिनीच्या मोहापायी सख्ख्या भावाचा काढला काटा

जमिनीच्या मोहापायी सख्ख्या भावाचा काढला काटा

Next

लोणी काळभोर -  वडिलोपार्जित शेतजमिनीच्या भांडणाच्या कारणावरून मेहुण्याच्या सांगण्यावरून कट रचून भावाने आपल्या दोन मुलांच्या सहाय्याने सख्ख्या भावाचा लाकडी दांडके व टिकावाने मारून निर्घृणपणे खून केल्याची घटना भांबोरा, यमाईनगर, (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे घडली.
या घटनेत हनुमंत कोंडिबा चव्हाण (वय ५५) यांचा खून झाला असून त्यांचा मुलगा राहुल हनुमंत चव्हाण (वय २७, रा. भांबोरा, यमाईनगर, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश कोंडिबा चव्हाण, किरण रमेश चव्हाण, गणेश रमेश चव्हाण (भांबोरा, यमाईनगर, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व सुनील रामदास पवार (रा. घुगलवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या चौघांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनुमंत व रमेश चव्हाण या दोघांनी ७ ते ८ वर्षांपूर्वी बहीण भामाबाई सर्जेराव शितोळे (रा. भांबोरा, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांच्याकडून प्रत्येकी अर्धा एकर जमीन विकत घेतली होती. त्यानंतर ५ ते ६ वर्षांपूर्वी पैशाची गरज असल्याने हनुमंत चव्हाण यांनी आपला भाऊ रमेश याचा मेहुणे सुनील रामदास पवार याला तीन लाख रुपयांना विकली होती. त्या वेळी पवार याने ही जमीन त्याची बहीण व रमेश चव्हाण याची बायको हिचे नावे खरेदीखताने घेतली होती.
हा व्यवहार होताना हनुमंत चव्हाण याच्याकडे पैसे आल्यानंतर तीन लाख रुपये घेऊन परत द्यायची ठरले होते. ४ ते ५ महिन्यांपूर्वी हनुमंत चव्हाण याच्याकडे उसाचे पैसे आल्याने ३ लाख रुपये जमवून जमीन परत घेण्याकरिता सुनील पवार याच्याकडे गेले. परंतु पवार याने जमीन परत देण्यास नकार दिला. भाऊ रमेश याचा सुनील मेहुणा असल्याने दोन्ही भावांत शेतजमिनीच्या कारणावरून वाद सुरू झाले. त्यांत वडिलोपार्जित शेतजमिनीच्या हिश्श्याच्या कारणावरून भांडणे होत होती. त्या वादात पवार हस्तक्षेप करून रमेशची बाजू घेऊन हनुमंतवर दबाव आणून धमकावत होता.
६ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून दोन्ही भावांत वाद झाला. त्या वेळी हनुमंत रमेश यांस आपण जमिनीची मोजणी करू असे म्हणत. परंतु रमेश याने त्याचे काहीच ऐकून न घेता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्याने अचानक हातात पाणी धरण्याचे खोरे त्यांचा मुलगा किरण याने लाकडी दांडके व गणेश याने लोखंडी टिकाव घेऊन हनुमंत याच्या अंगावर धावून आले. त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली, म्हणून हनुमंत याची
राहुल व महेंद्र ही दोन मुले भांडण सोडविण्यासाठी गेले, त्या वेळी रमेश याने भाऊ हनुमंत याला पकडले होते.
किरण लाकडी दांडक्याने मारहाण करीत होता. तेवढ्यात गणेश याने त्याच्या हातातील लोखंडी टिकाव त्याच्या डोक्यात मारला. यामुळे हनुमंत चव्हाण याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले व ते बेशुद्ध पडल्याने मारहाण करणारे तिघेही निघून गेले. हनुमंत चव्हाण याला उपचारासाठी तत्काळ दौंड येथील पिरॅमिड रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्या रुग्णालयात उपचार सुरू असताना हनुमंत चव्हाण शुद्धीवर आले नाहीत, म्हणून पुढील औषधोपचार करण्यासाठी त्यांच्या मुलांनी आज ससून रुग्णालयात नेण्याचे ठरवले. रुग्णवाहिकेतून पुणे येथे निघाले असता त्यांनी यवत टोलनाका ओलांडून पुढे आले असता हनुमंत चव्हाण यांचा श्वासोच्छ्वास व शरीराची हालचाल मंदावल्याचे जाणवले, म्हणून त्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दुपारी १-३० वाजण्याच्या सुमारास नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते मृत झाले असल्याचे घोषित केले. लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी अहमदनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Web Title: brother Murder News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.