संपत्तीच्या कारणावरून भावाने मोठ्या बहिणीला पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:10 AM2021-09-27T04:10:40+5:302021-09-27T04:10:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ते दोघेही सख्ख्ये भाऊ-बहीण. मात्र, वडिलांच्या संपत्तीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यातूनच भावाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ते दोघेही सख्ख्ये भाऊ-बहीण. मात्र, वडिलांच्या संपत्तीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यातूनच भावाने मोठ्या बहिणीच्या घरी जाऊन तिला पेटविल्याची घटना औंधमध्ये शनिवारी घडली. त्यात बहीण मोठ्या प्रमाणावर भाजली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी भावाला अटक केली आहे.
शाम मनोहर पतंगे (वय ४५, रा. यशोधन सोसायटी, चिंतामणीनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी औंधमध्ये राहणाऱ्या ४८ वर्षांच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वडिलांच्या संपत्तीवरून बहीण-भावामध्ये वाद आहेत. फिर्यादी या औंधमधील घरी असताना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शाम पतंगे त्यांच्या घरी दारू पिऊन आला. त्यांच्याशी वाद घातला. फिर्यादी या स्वयंपाक घरामध्ये खुर्चीवर बसून आराम करीत असताना शाम याने फिर्यादी यांना आग लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादी यांची हनुवटी, दोन्ही गाल तसेच मानेपासून खाली पायापर्यंतचा सर्व भाग भाजलेला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शाम पतंगे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार अधिक तपास करीत आहेत.