Pune News | आंबळेतील खुनी हल्यात भावजयीचा मृत्यू भावाची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 02:04 PM2023-04-25T14:04:22+5:302023-04-25T14:05:34+5:30
आरोपी सावत्रभावाचाही आंबळे येथे अपघात झाल्याने या अपघातात तोही गंभीर जखमी झाला आहे...
न्हावरे (पुणे) : आंबळे ( ता. शिरूर ) गावाच्या शिवारातील आंब्याचा मळा येथे सावत्रभावाने डंबेल व चाकूने केलेल्या खुनी हल्ल्यात भावजयीचा मृत्यू झाला. तर भावाची प्रकृती गंभीर आहे. हल्ला करून घटनास्थळावरुन दुचाकीवरून पलायन करणाऱ्या आरोपी सावत्रभावाचाही आंबळे येथे अपघात झाल्याने या अपघातात तोही गंभीर जखमी झाला आहे.
आंबळे येथे सावत्रभावाने केलेल्या खुनी हल्ल्यात भावजय प्रियंका सुनील बेंद्रे (वय २५ ) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती व आरोपीचा सावत्रभाऊ सुनील बाळासाहेब बेंद्रे यांची प्रकृती गंभीर आहे. तर घटनास्थळावरुन दुचाकीवरून पलायन करणारा आरोपी सावत्रभाऊ अनील बाळासाहेब बेंद्रे याचा आंबळे येथे अपघात झाल्याने या अपघातात त्यालाही गंभीर दुखापत झाल्याने तोही अत्यवस्थेत आहे.
आंबळे गावाच्या शिवारातील आंब्याचा मळा येथे सुनील बाळासाहेब बेंद्रे व प्रियंका सुनील बेंद्रे हे राहत्या घरात झोपलेले असताना आज ( दि.२५ ) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे याने सावत्र भाऊ सुनील बेंद्रे व भावजय प्रियंका बेंद्रे यांना व्यायामासाठीच्या डंबेलने मारहाण व चाकूने वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. या खुनी हल्यात सुनील बेंद्रे व प्रियंका बेंद्रे यांच्या डोक्याला व पोटात गंभीर दुखापत झाली. हे कृत्य करून आरोपी अनिल बेंद्रे याने आपल्या दुचाकीवरून घटनास्थळावरुन पलायन केले दरम्यान आंबळे येथे शिरूर-न्हावरे रस्त्यावर त्याने समोरून येणाऱ्या चार चाकी गाडीला जोरदार धडक दिल्याने तोही त्यात गंभीररित्या जखमी झाला.
मयत प्रियंका बेंद्रे व त्यांचे पती सुनील बेंद्रे दोघेही आयटी इंजिनिअर असून ते पुण्यात एका नामांकित कंपनीत नोकरीस होते. आठ दिवसानंतर ते लंडन येथे नोकरीसाठी जाणार होते. त्यामुळे ते दोघे आंबळे येथे आपल्या मूळगावी आले होते. दरम्यान सावत्रभावाने केलेल्या हल्ल्यामुळे दोघांचेही स्वप्न अधुरेच राहिले. या घटनेत प्रियंकाचा जीव गेल्याने व सुनीलची प्रकृती चिंताजनक असल्याने या घटनेबाबत परिसरातील ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिस उपअधिक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, सहाय्यक फौजदार गोपीचंद चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची सुत्रे वेगाने हलवली आहेत.