मेहुण्याचा खून; भावजीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:26 AM2018-07-28T03:26:31+5:302018-07-28T03:26:49+5:30
प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या मेहुण्याचा चाकूने वार करून खून
पुणे : प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या मेहुण्याचा चाकूने वार करून खून करणाºया भावजीला जन्मठेप आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.
अलोक किशोर कांबळे (वय २८, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने मेहुणा निखिल बाळू कदम (वय २४, रा. येरवडा) याचा १४ डिसेंबर २०१४ साली रोजी रात्री दहाच्या सुमारास येरवडा येथील आंबेडकर सोसायटी परिसरातील व्यायाम शाळेसमोर खून केला होता. निखिल याचे वडील बाळू वकील कदम (वय ५२) यांनी याबाबत येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सुरेश गवळी यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी रोहित गवळी याची साक्ष महत्त्वाची ठरली. येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश भोसले, कॉन्स्टेबल सुधीर चिकणे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहाय केले.
अलोक याने निखिलची बहिण नेहा हिच्याशी प्रेम विवाह केला होता. त्यास मयत निखिल आणि फियार्दी बाळू यांचा विरोध होता. याच कारणावरून निखिल याने अलोक याच्यावर २०१३ मध्ये वार केले होते. घटनेच्या दिवशी निखिल आणि अलोक एका वरातीमध्ये होते. निखिल मित्रांसह गप्पा मारत होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून अलोक याने निखिल याच्यावर चाकुने वार करून त्याचा खून केला. प्रत्यक्षदर्शी रोहित याने निखिल याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हातावर चाकू लागून तो जखमी झाला होता.