‘बीआरटी’ उद्घाटनाला मुहूर्त
By admin | Published: November 28, 2015 12:42 AM2015-11-28T00:42:49+5:302015-11-28T00:42:49+5:30
अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिकफाटा-वाकड बीआरटीएस मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला आहे.
पिंपरी : अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिकफाटा-वाकड बीआरटीएस मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सांगवी-किवळे, निगडी-दापोडी, नाशिक फाटा-वाकड आणि देहू-आळंदी रस्ता ते काळेवाडी फाटा अशा चार मार्गांवर एकूण ४५ किलोमीटर लांबीच्या बीआरटीएसची मार्गिका सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी सांगवी-किवळे ही मार्गिका ५ सप्टेंबरला सुरू करण्यात आली. त्यानंतर नाशिक फाटा-वाकड मार्गिकेचे उद्घाटन दिवाळीतच करण्याचे नियोजित होते. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची तारीख न मिळाल्याने उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. महापौर शकुंतला धराडे यांनीही लेखी पत्र पाठवून या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी अजित पवार यांच्याकडे तारीख मागितली. मात्र, तारीख मिळाली नाही. दरम्यान, महापौरही स्पेन दौऱ्यावर गेल्या. दौऱ्यावरून परतल्यानंतर पुन्हा पत्रव्यवहार केल्यानंतर उद्घाटनासाठी अखेर पवार यांची वेळ मिळाली.
त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही केवळ अजित पवार यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शनिवारी सकाळी पिंपळे सौदागर येथे या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे.
नाशिक फाटा-वाकड या आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २३४ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. शनिवारपासून सुरू होत असलेल्या या बीआरटीएस मार्गिकेवर एकूण १७ बसथांबे उभारण्यात आले आहेत. या थांब्यांसाठी ७ कोटी १४ लाखांचा खर्च झाला आहे. या रस्त्यामुळे शहराचा दक्षिणेकडील
भाग उत्तरेकडील भागाशी जोडणार असून, हिंजवडी आयटी पार्क व
भोसरी एमआयडीसी या दोन महत्त्वाच्या ठिकाणी ये-जा करणे सोयीचे होणार आहे. शहरामध्ये बीआरटीबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती. शनिवारी बीआरटीचे उद्घाटन होणार आहे.(प्रतिनिधी)