रिंगरोडच्या १३४ किलोमीटर मार्गावर उभारणार बीआरटी ट्रॅक : किरण गित्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 12:07 PM2018-12-03T12:07:07+5:302018-12-03T12:18:26+5:30
पीएमआरडीएच्या वतीने वर्तुळाकार बीआरटी मार्ग बनविण्यात येणार आहे.
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील व तसेच या दोन्ही महानगरपालिकेच्या लगतच्या भागातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रिंगरोडचे काम सुरू आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने या मार्गावर वर्तुळाकार बीआरटी मार्ग बनविण्यात येणार आहे. जवळपास १३४ किलोमीटर मार्गावर बीआरटी बस धावणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
पीएमआरडीएच्या या रिंगरोडची एकूण लांबी १२८ किमी आहे. तर रुंदी ११० मीटर आहे. पहिल्या टप्प्यातील ३३ किलोमीटरच्या सातारा रस्ता ते अहमदनगर रस्ता (कात्रज ते वाघोली) रिंगरोडचे काम सुरू आहे. नगर रस्त्यावर १४ किलोमीटर मार्गावर बीआरटीचे १३ स्टेशन्स उभारण्यात येणार आहे.
पीएमआरडीएच्या वतीने (कॉम्प्रिहेन्सिव मोबिलिटी प्लॅन-सीएमपी) तयार करण्याचे काम एल अॅँड टी कपंनीला दिले होते. त्याचा सर्वकष अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये मेट्रो, रिंगरोड, रेल्वे (लोकल) मार्ग, बीआरटी आणि टाऊन प्लॅनिंगच्या योजना आणि रस्ते विकासासाठी अनेक प्रस्ताव मांडण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी महापालिकेकडून वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे.
.........................
पुण्याच्या १२८ किलोमाीटर रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरूवात झाली आहे. उर्वरित मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मार्गाचे भूसंपादनाचे काम झाले असून, प्रत्यक्ष कामाला सुरूवात देखील झाली आहे. एकदा काम सुरू झाल्यावर त्यामध्ये खंड पडायला नको म्हणून पुढच्या टप्प्यातील जागेचेही भूसंपादन सुरू आहे.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए
..............
२०२८ पर्यंत या मार्गावर धावणार बीआरटी
येरवडा ते विमानतळ गेट (५.०५ कि.मी.)
कस्पटे वस्ती ते काळेवाडी फाटा (१.८ कि.मी.)
एचसीएमटीआर ते पुणे महापालिका (३८.४५ कि.मी.)
एचसीएमटीआर ते पिंपरी-चिंचवड महापालिका (३१.४ कि.मी.)
चिंचवड-तळवडे (१२ कि.मी.)
बीआरटी मार्ग-पश्चिम बाह्यवळण मार्ग (४९ कि.मी.)
.......................
बीआरटीचे १८ ठिकाणी होणार मल्टी मॉडेल हब
दोन्ही महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वारजे, स्वारगेट, शिवाजीनगर, वल्लभनगर, चिंचवड, निगडी भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, बालेवाडी, वाकड, हिंजवडी, चांदणी चौक, वडगाव बुद्रुक, खराडी, पुलगेट, कात्रज, हडपसर, वाघोली, मोशी आदी दोन्ही शहरांतील १८ ठिकाणी मल्टी मॉडेल हब करण्याचा २० वर्षांच्या सर्वकष वाहतूक आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे.