बीआरटीचे काम प्रगतिपथावर
By admin | Published: June 4, 2016 12:15 AM2016-06-04T00:15:44+5:302016-06-04T00:15:44+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने किवळेतील मुकाई चौक ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक या दरम्यानच्या बीआरटीएस रस्त्याचे काम तीन भागात होत आहे
किवळे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने किवळेतील मुकाई चौक ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक या दरम्यानच्या बीआरटीएस रस्त्याचे काम तीन भागात होत आहे. किवळे व निगडी या दोन्ही बाजूंची कामे सध्या वेगात सुरू असून, काही भागातील डांबरीकरणाची कामे पूर्ण होऊन वाहतूकही सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. आजतागायत दोन्ही बाजूंकडील रस्त्यांचे एकूण ५५ टक्के काम पूर्ण झाले असून या रस्त्याच्या बांधकामासाठी एकूण ३३ कोटी २० खर्च झाला आहे. या रस्त्यावर रावेत येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या नकाशाचे (डिझाईन) काम सध्या प्रगतिपथावर असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मुकाई चौक ते भक्ती-शक्ती चौकादरम्यानच्या या ४५ मीटर रुंदीच्या या रस्त्याचे १४ जुलै २०१४ ला मुकाई चौकात व निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. जुलै २०१५ मध्ये रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४, १८ व १९ या तीन प्रभागांतून हा रस्ता विकसित करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम तीन भागात सुरू झालेले आहे. पहिल्या टप्प्यातील किवळे-मुकाई चौक ते लोहमार्ग दरम्यानच्या रस्त्याची एकूण लांबी २८५० मीटर राहणार असून, रुंदी ४५ मीटर असणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील लोहमार्ग ते निगडी भक्ती-शक्ती चौकादरम्यानच्या कामाची लांबी दीड किलोमीटर असून, या दोन्ही भागातील कामासाठी ७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही भागांतील रस्त्याची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे.
किवळे ते निगडी दरम्यान रावेत येथे लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, पुलाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. महापालिकेने यासाठी ८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उड्डाणपुलाच्या डिझाईनचे काम सध्या सुरू असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. किवळे ते आदर्शनगर चौकापर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते एमआयडीसीच्या हद्दीपर्यंत काम पूर्ण होत आले आहे. एमआयडीसी पाणीपुरवठा केंद्राच्या आवारातील, तसेच रावेत व पुणे-मुंबई लोहमार्गाच्या समांतर भागात रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्यामुळे द्रुतगती मार्गाने पुणे-मुंबईकडे ये-जा करण्यासाठी जवळचा रस्ता उपलब्ध होणार आहे. यामुळे सततच्या वाहतूककोंडीतून सुटका होणार असल्याने वेळ व प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)