समस्या सुटल्यावरच बीआरटीस गती
By admin | Published: August 3, 2015 04:03 AM2015-08-03T04:03:44+5:302015-08-03T04:03:44+5:30
संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यान सुमारे साडेसहा किलोमीटरच्या बीआरटी (बस रॅपिड ट्रान्सपोर्ट) मार्गाचे अंतर कापण्यासाठी बसला २० मिनिटांचा कालावधी लागत
येरवडा : संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यान सुमारे साडेसहा किलोमीटरच्या बीआरटी (बस रॅपिड ट्रान्सपोर्ट) मार्गाचे अंतर कापण्यासाठी बसला २० मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे बसमधून प्रवास केल्यानंतर समोर आले. सध्या या मार्गावर रिकाम्या बस फिरवून चाचणी घेण्यात येत आहे. प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर हा कालावधी वाढण्याचीही शक्यता आहे. या मार्गाची ५ आॅगस्टपर्यंत चाचणी घेण्यात येणार आहे.
या बीआरटी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूकडील संपूर्ण रेलिंगची रंगरंगोटी व इतर किरकोळ कामे सध्या सुरू आहेत.
या मार्गाची चाचणी घेण्यासाठी १ आॅगस्टपासून बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. संगमवाडी ते विश्रांतवाडीदरम्यान १० बस दिवसभर फेऱ्या मारून चाचणी घेत आहेत. यामध्ये बस प्रवासात येणाऱ्या अडचणी व बसस्थानकांचे स्वयंचलित दरवाजे बस थांबल्यावर उघडतात की नाही याची चाचपणी करून नोंद घेण्यात येत आहे.विश्रांतवाडीमध्ये बीआरटीच्या बस थांबण्यासाठी विमानतळ रस्त्यावर ‘टर्मिनल’ करण्यात आले आहे. संगमवाडीमध्ये मात्र असे टर्मिनल दिसले नाही.
प्रवासादरम्यान पुढील स्थानक कोणते याची बसमध्ये यंत्राद्वारे आपोआप घोषणा होते. तसेच बसमध्ये बसवलेल्या ‘डिस्प्ले’वरही पुढच्या स्थानकाचे नाव येते. मात्र काही वेळा ही यंत्रणा काम करीत नसल्याचे दिसून आले.
आंबेडकर सोसायटी बसथांब्याचा ‘बीआरटी सिग्नल’ बंद आहे. या ठिकाणी डेक्कन कॉलेज चौकाकडून आंबेडकर सोसायटीकडे जाताना एकाच वेळी डाव्या ‘लेन’मधील वाहने उजवीकडे वळतात, तर उजव्या लेनमधील बस सरळ जात असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.
बसमधील चालक व वाहकांकडे बीआरटीविषयी चौकशी केली असता, त्यांनी समाधान व्यक्त करीत सध्यातरी काहीही अडचणी नसल्याचे सांगितले.