गाडीला कट मारल्याच्या रागातून फोडला डोळा, हडपसर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 08:30 PM2020-02-05T20:30:04+5:302020-02-05T20:32:53+5:30
जखमी वानखेडे हे उच्चशिक्षित असून त्यांनी डोळ्यासंबंधीचा कोर्स पूर्ण केला आहे. परंतु या किरकोळ वादातून त्यांचा एक डोळाच निकामी झाला आहे
पुणे :गाडीला कट मारल्याच्या रागातून तरुणाचा चाकूने डोळा काढलेल्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. यासाठी पोलिसांनी तब्बल 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा माग काढला.
याबाबत अधिक माहिती अशी की, 'हडपसर जवळील मुंढवा चौकात हॉटेल कल्ट नजीक रविवार (दि २ फेब्रुवारी) रोजी हे घटना घडली आहे.यावेळी रात्री दीड ते दोनच्या सुमारास आरोपी योगेश चंद्रकांत हनमणे (वय 24), रितेश अंबादास जाधव (वय 21) आणि अविनाश सुनील गायकवाड (वय 22) यांच्या चारचाकी गाडीसमोर जखमी अक्षय जाधव (वय २४) आणि सतीश वानखेडे यांची दुचाकी आली. त्यावेळी आरोपींनी यावेळी गाडीला कट का मारला? अशी विचारणा करीत, रागातून वानखेडे यांच्या अंगावर आणि एका डोळ्यावर धारदार शास्त्राने वार केला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी तपास केला. गाडीच्या बोनेटवर असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशावरून त्यांनी गाडीचा शोध घेतला. त्यानंतर आरटीओकडून माहिती घेऊन पुणे आणि मुंबई येथून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यातील जखमी वानखेडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी वानखेडे हे उच्चशिक्षित असून त्यांनी डोळ्यासंबंधीचा कोर्स पूर्ण केला आहे. परंतु या किरकोळ वादातून त्यांचा एक डोळाच निकामी झाला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि इतर कर्मचाऱ्यांनी तपास केला.