Pune: प्रॉपर्टीच्या वादातून स्वतःच्या आईचा निर्घृण खून; मुलाला सशर्त जामीन
By नम्रता फडणीस | Published: August 11, 2023 07:27 PM2023-08-11T19:27:46+5:302023-08-11T19:29:54+5:30
आरोपीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल केली...
पुणे : प्रॉपर्टीच्या वादातून स्वत:च्या आईचा निर्घृण खून केल्याप्रकरणात मुलाला १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. मेंधे यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. अधिक माहितीनुसार, मृत महिला बेपत्ता होती. आरोपी व सुना तिचा सतत छळ करत होत्या. यासंदर्भात मुंढवा पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी आल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन मुंढवा पोलिसांनी आरोपी व इतरांना समजही दिली होती.
५ ऑगस्ट रोजी आरोपीचा मुलगा व त्याच्या आईशी मृत महिलेचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावरून तिने आरोपीचा मुलगा व सुनेला घराबाहेर काढले होते. त्यानंतर मृत महिला बेपत्ता झाली. त्यामुळे आरोपीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल केली. पुढे मुंढवा पोलिस बेपत्ता महिलेचा शोध घेत असताना, लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत मुळा - मुठा नदीपात्रात मृत महिलेच्या शरीराचे अवयव मिळून आले. ते अवयव मृत महिलेचेच असल्याचे सिध्द झाल्याने मुंढवा पोलिसांनी आरोपी व त्याच्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपीने ॲड. शुभांगी परुळेकर यांच्यामार्फत पुणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. ॲड. परुळेकर यांनी आरोपीची बाजू मांडताना, घटनेला कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही तसेच आरोपी हा घटनेच्या वेळी या ठिकाणी राहत नव्हता. त्यामुळे आरोपीचा सदर घटनेत प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही. आरोपीचा गुन्हा करण्याचा कोणताही हेतू नव्हता. या बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.