पुण्यात टोळक्याकडून तरुणाचा निर्घृण खून; मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 09:34 AM2020-01-22T09:34:14+5:302020-01-22T11:47:52+5:30
गंभीर जखमी अवस्थेत सागर घरी आला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुणे : मित्र असल्याचे वाटून आवाज दिल्याने झालेल्या वादातून ४ ते ५ जणांच्या टोळक्याने तरुणाला मारहाण करुन त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना विश्रांतवाडी येथील धानोरी परिसरात मध्यरात्री घडली़. सागर महादेव भालेराव (वय २४, रा. मुंजाबावस्ती, धानोरी)याचा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास खून झाला असून चार संशयितांना विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा बिगारी काम करत होता. रात्री जेवणानंतर तो व त्याचे मित्र येथील मुंजाबावस्ती गणपती मंदिर चौकातून पायी जात होते. त्यावेळी त्यांच्यासमोरुन एक जण बुलेटवर गेला. सागर याला तो आपला मित्र असल्याचे वाटल. म्हणून त्याने आवाज दिला. त्याचवेळी त्याच्या पाठोपाठ आणखी एक दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी सागरला तू आवाज का दिला, तू कोण आहेस असे विचारले. यावरुन त्यांच्या वाद झाला़ याच वादातून दुसऱ्या गटातील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी पटट्यासह लाथाबुक्यांनी मारहाण करून पळून गेले.
गंभीर जखमी अवस्थेत सागर घरी आला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी तात्काळ विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड, गुन्हे निरीक्षक रविंद्र कदम यांनी धाव घेतली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.