पुण्यात शिवसेनेच्या युवा पदाधिकाऱ्याचा निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 02:25 AM2020-10-03T02:25:04+5:302020-10-03T02:25:28+5:30
राजकीय वैमनस्यातून प्रकार घडल्याचे निष्पन्न
पुणे : शिवसेनेचे युवा पदाधिकारी दीपक विजय मारटकर यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास बुधवार पेठेतील गवळी अळी परिसरात घडली. याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाºयासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा खून राजकीय वैमनस्यातून झाल्याचे तपासातून समोर आले आहे.
मारटकर यांचे मेव्हणे राहुल भगवान आलमखाने ( वय ४३ रा. गवळी आळी, बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अश्विनी कांबळे, महेंद्र सराफ, सनी कोलते, संदीप कोलते, रोहित कांबळे, राहुल श्रीनिवास रागीर(रा.घोरपडे पेठ) यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघांना ताब्यात घेतले आहे. दीपक यांचे वडील शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे महिन्याभरापूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. दरम्यान सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत विजय मारटकर यांनी बुधवार पेठ भागातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती. बहुजन समाज पक्षाकडून अश्विनी कांबळे ही प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याविरुद्ध उभी होती. त्यावेळी मारटकर आणि कांबळे यांचा वाद झाला होता. तसेच मारटकर यांचा महेंद्र सराफ याच्याबरोबर देखील वाद झाला होता. आरोपींनी धमकावल्याची माहिती दीपक फरासखाना पोलिसांत दिली होती.
सुमारे ४७ केले वार
दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने ४७ वार केले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.