Pimpri Chinchwad: तळवडेत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून, गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: June 11, 2024 08:44 PM2024-06-11T20:44:38+5:302024-06-11T20:45:01+5:30
तळवडे येथे सोमवारी (दि. १०) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली....
पिंपरी : तरुणाच्या डोक्यात चाकूने, कोयत्याने वार करून तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह छिन्नविछिन्न केला. तळवडे येथे सोमवारी (दि. १०) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
नीलेश उर्फ मुकुंद अशोक भंडारी (३६, रा. गुलमोहर हौसिंग सोसायटी, परंडवाल चौकाजवळ, देहूगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोनेश यंकपा भंडारी (२२, रा. देहूगाव, मूळ रा. कर्नाटक) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नीलेश हे सोमवारी (दि. १०) रात्री पावणेबाराच्या सुमारास तळवडेकडून देहूच्या दिशेने दुचाकीवरून येत होते.
कॅनबे चौकाच्या थोडे पुढे तुळजाभवानी स्क्रॅप सेंटरसमोरील रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी नीलेश यांच्या दुचाकीला धक्का देत त्यांना खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नीलेश हे घाबरून रस्ता ओलांडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पळाले. त्यानंतर संशयितांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठले. कोयत्याने, चाकूने नीलेश यांच्या डोक्यात, कपाळावर, छातीवर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर रस्त्यालगत पडलेले सिमेंटचे गट्टू व दगडाने त्यांच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला.