"चांगल्या सुविधा देणे लांबच..." पुरंदरच्या नीरेतील BSNL ची सेवा २४ तासांपेक्षा जास्त काळ ठप्प!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 06:13 PM2022-08-08T18:13:01+5:302022-08-08T18:13:28+5:30
मोबाईलसह सर्व सेवा बंद झाल्याने सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांचे व्यवहार विस्कळीत
नीरा : रविवार पासून चोवीस तासांपेक्षा जास्त काळ नीरा (ता.पुरंदर) येथील भारत दूरसंचार निगम लि. (बीएसएनएल)ची इंटरनेट सह सर्व सेवा बंद झाल्याने नीरा परिसरातील बँकाचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. बीएसएनएलची इंटरनेट सह सर्व सुविधा तातडीने सुरु करावी अशी मागणी नीरा व परिसरातील जनतेतून होत आहे.
रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून बीएसएनएलच्या सर्व सुविधा बंद होत्या. एकीकडे केंद्र सरकार ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेसाठी नवनवीन योजना आणून अच्छे दिन आल्याचे दाखवित असून दुसरीकडे मात्र बीएसएनएलची इंटरनेट सह सर्व सेवा बंद पडताना दिसत आहे. नीरा आणि परिसरात काल पासून बीएसएनएलची सेवा ठप्प आहे. वास्तविक बीएसएनएलचे ग्राहक दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट सुविधेचे बिल वेळेवर भरत असताना बीएसएनएल मात्र अखंडित सेवा देऊ शकत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करू लागले आहे. सासवडच्या ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर उमा नरगुंडे यांनी गेली दोन दिवस सेवा ठप्प असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खाजगी क्षेत्रातील विविध मोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव नविन योजना आणत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बीएसएनएल कंपनीला ग्राहकांना चांगल्या सुविधा देणे तर लांबच, पण आहे ती तरी सुविधा नीट देता येत नाही. शासनाच्या अशा कितेक सुविधा जनतेला देता येत नसल्याबद्दल नागरिकांनी केंद्र सरकारच्या सुविधाची खिल्ली उडविली. बीएसएनएलने तातडीने नीरा व परिसरातील दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट सुविधा सुरु करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
''काल नीरा परिसराकडे जाणारी ऑप्टिकल फायबर केबल तुटली आहे.त्यामुळे सेवा बंद पडली आहे. ही सेवा सुरू करण्याचं काम सुरू आहे आर्धि अधिक सेवा सुरू करण्यात आली असून लवकरच पूर्ण सेवा सुरू होईल. - उमा नरगुंडे (ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर, सासवड दूरसंचार)''