बीएसएनएलमध्ये मराठी प्रतीक्षेतच
By Admin | Published: March 17, 2016 03:23 AM2016-03-17T03:23:14+5:302016-03-17T03:23:14+5:30
भारत संचार निगम (बीएसएनएल) या दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या शासकीय नियंत्रण असलेल्या कंपनीमध्ये मराठीला सापत्न वागणूक मिळत असल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत.
पुणे : भारत संचार निगम (बीएसएनएल) या दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या शासकीय नियंत्रण असलेल्या कंपनीमध्ये मराठीला सापत्न वागणूक मिळत असल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. ‘बीएसएनएल’च्या १९७ या हेल्पलाइनशी (डिरेक्टरी एन्क्वायरी) संपर्क साधल्यानंतर तिथे मराठीतून पर्याय उपलब्ध असतानाही अनेकदा हिंदी भाषिक प्रतिनिधीशी संवाद साधावा लागत आहे.
दूरसंचार क्षेत्रात पहिल्यांदा देशातील कोट्यवधी ग्राहकांपर्यंत पोहोचणारी बीएसएनएल ही कंपनी आहे. केंद्र सरकारचे नियंत्रण असलेल्या या कंपनीने दूरध्वनी आणि मोबाईलसेवेच्या माध्यमातून देशभरातील विविध भाषिक ग्राहकांना आपलेसे केले. इतर खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना कंपनीने नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध बदलही केले. ग्राहकांसाठी विविध हेल्पलाइन सुरू केल्या. त्यामध्ये १९७ या हेल्पलाइनचाही समावेश आहे. बीएसएनएलचे ग्राहक असलेल्या संस्था किंवा व्यक्तींचे दूरध्वनी क्रमांक, पत्ते हवे असलेल्या या क्रमांकाशी संपर्क साधल्यानंतर ते उपलब्ध करून दिले जातात. अनेक ग्राहक या सुविधेचा लाभ घेतात. पण या सुविधेमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान मिळत असल्याचे दिसून आले आहे.
मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असताना एखाद्या सरकारी नियंत्रण असलेल्या संस्थेकडून मराठीची उपेक्षा होत आहे. बीएसएनएलच्या १९७ या हेल्पलाइनशी संपर्क साधल्यानंतर लगेचच हिंदी, इंग्रजी व मराठी भाषा निवडण्यासाठी अनुक्रमे १, २ आणि ३ क्रमांक निवडण्यास सांगतात. त्यानुसार मराठी भाषेची निवड केल्यानंतर हेल्पलाइन प्रतिनिधीला दूरध्वनी जोडला जातो.
हिंंदी भाषिक प्रतिनिधींना नीट मराठी समजत नसल्याने नेमक्या कुठल्या संस्था क्रमांक किंवा पत्ता हवा आहे, हे कळत नाही. त्यांना संबंधित संस्थेच्या नावाची इंग्रजी अक्षरे सांगून ते नाव तयार करीत होते. त्यानंतर पुढील शोधाशोध सुरू होत होती. यामध्ये वेळेबरोबरच ग्राहकांना मनस्तापही सहन करावा लागत आहे. याविषयी संबंधित प्रतिनिधींकडेच विचारणा केली असता एकाने मराठी हेल्पलाइनवर दुसऱ्या ग्राहकाचे संभाषण सुरू असल्याने इकडे जोडला गेला असावा, असे सांगितले, तर काहींनी त्याबाबत बोलण्यास असमर्थता दर्शविली.
सजग नागरिक मंचचे जुगल राठी यांनाही हेल्पलाइनवरही असाच अनुभव आला. मराठी पर्याय निवडूनही त्यांना हिंदीतून प्रतिनिधीशी संवाद साधावा लागला. पुण्यातील एका संस्थेचा दूरध्वनी मिळविण्यासाठी त्यांना संपर्क साधला होता. संबंधित प्रतिनिधीला त्या संस्थेचा क्रमांक न मिळाल्याने त्याने थेट एका खासगी सेवा पुरविणाऱ्या संस्थेचा क्रमांक दिल्याचे राठी यांनी सांगितले.
हेल्पलाइनवर मराठीला सापत्न वागणूक मिळत असल्याबाबत पुण्यातील बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर ही हेल्पलाइन डेहराडून येथील कॉल सेंटरमधून सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याचे संपूर्ण नियंत्रण तेथूनच होते. याबाबतची तक्रार मेलद्वारे पाठविल्यास त्यांच्याकडे ही तक्रार दिली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मराठी भाषेची निवड करूनही अनेकदा हिंदीतून संवाद सुरू झाल्याचा अनुभव येत आहे. ‘लोकमत प्रतिनिधी’ने या क्रमांकावर सहा वेळा संपर्क साधला. त्यातील केवळ दोन वेळा मराठी भाषिक प्रतिनिधीशी दूरध्वनी जोडला गेला. इतर चार वेळा हिंदी भाषिक प्रतिनिधीशी संवाद साधावा लागला.