महात्मा टेकडीवर १२९ प्रजातींचे पक्षीवैभव; दुर्दैवाने त्याठिकाणी राडारोडा, कचऱ्याचे साम्राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:05 PM2022-01-24T14:05:19+5:302022-01-24T14:10:22+5:30
कोथरूडमधील महात्मा टेकडीवर जैवविविधता मोठ्या प्रमाणावर असून, त्या ठिकाणी सुमारे १२९ पक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत
श्रीकिशन काळे
पुणे : कोथरूडमधील महात्मा टेकडीवर जैवविविधता मोठ्या प्रमाणावर असून, त्या ठिकाणी सुमारे १२९ पक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. गेल्या सात वर्षांमध्ये या नोंदी तीन विद्यार्थ्यांनी घेतल्या असून, त्याविषयी प्रबंधही लिहिला आहे. या अभ्यासाचा फायदा जैवविविधता संवर्धन करण्यासाठी आणि टेकडीचे वैभव जपण्यासाठी होणार आहे.
या नोंदी गरवारे महाविद्यालयातील एमएस्सी बायोडायव्हर्सिटीचा विद्यार्थी अर्णव गंधे, एमआयटी फोटोग्राफीचा विद्यार्थी अद्वैत दिंडोरे व एमआयटीमधील एमएस्सी बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी अथर्व बापट या तिघांनी केल्या आहेत. हे सर्वेक्षण तिघांनी २०१४ ते २०२१ दरम्यान केले. हे सर्वेक्षणाचा प्रबंध ‘न्यूजलेटर फॉर बर्ड वॉचर’ या जर्नलमध्ये प्रसिध्द झाला आहे.
हा अभ्यास विविध टप्प्यात करण्यात आला. सकाळी ६ ते १० या कालावधीतील कोणतेही दोन तास निवडून पक्ष्यांची नोंद केली. त्यांचे वास्तव्य कुठे आहे, त्यांच्या सवयी नोंदवल्या. तसेच दुपारी, संध्याकाळी देखील त्यांच्या नोंदी घेतल्या गेल्या. रात्रीही ट्रेल करण्यात आला. महात्मा टेकडीला कोथरूड टेकडीही म्हटले जाते. ही टेकडी महत्त्वाची असली, तरी ती प्रसिध्द नाही. परंतु, पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून येथे जैवविविधता खूप आहे. शहरातील इतर टेकड्यांवरही पक्ष्यांची जैवविविधता खूप आहे. त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा तिघांनी व्यक्त केली.
या दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन
या ठिकाणी रेड नेक्ड फाल्कन, अमूर फाल्कन, बूटेड ईगल, शॉर्ट टोड स्नेक ईगल, बोनेलीस ईगल, ब्लॅक हिडेड कूकूशिक्रा, व्हरडिटर फ्लायकेचर, ब्लू रॉक थ्रस यासारखे दुर्मिळ पक्षी पहायला मिळतात.
पुर्वी हे पक्षी दिसायचे आता गायब
स्टेप ईगल, ब्लॅक हिडेड बंटिंग, चेस्टनट बिलिड सँडग्रुस, शॉर्टटेअर्ड आऊल, बूटेड ईगल, यलो क्राऊनेड वूडपेकर हे पक्षी आता दिसत नाहीत.
टेकडी धोक्यात !
कोथरूड टेकडी इतर कोणत्याही डोंगररांगेशी जोडलेली नाही. ती स्वतंत्र आहे. ही जागा लहान असून, तिथे वेगळी इकोसिस्टिम आहे. या जागेला अर्बन फॉरेस्टचा दर्जा द्यावा. परंतु, तिथल्या वन्यजीवांचा अधिवास आहे, तसाच नैसर्गिक राहण्यासाठी प्रयत्न करायला हवा. कोणतेही बांधकाम करू नये. दुर्दैवाने या ठिकाणी देखील कचरा, राडारोडा टाकला जात आहे. लोकांमध्ये येथील जैवविविधतेबाबत जनजागृती करायला हवी. तरच येथील निसर्ग वाचू शकतो, अशी अपेक्षा अर्णव गंधे यांनी व्यक्त केला.