‘बुद्ध’ म्हणजे सद्सदविवेकवादाचा आवाज : प्रेमानंद गज्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 03:56 PM2018-10-05T15:56:31+5:302018-10-05T15:58:57+5:30
मँजिस्टिक प्रकाशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा जयवंत दळवी स्मृति-पुरस्कार नाटक या वाडमयप्रकारासाठी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या ‘ द बुद्धा’ या नाटकास देण्यात येणार आहे. उद्या ( 5 आॅक्टोबर) ज्येष्ठ समीक्षक प्रा. पुष्पा भावे यांच्या अध्यक्षतेखाली गज्वी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त गज्वी यांच्याशी साधलेला हा संवाद.
मँजिस्टिक प्रकाशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा जयवंत दळवी स्मृति-पुरस्कार नाटक या वाडमयप्रकारासाठी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या ‘ द बुद्धा’ या नाटकास देण्यात येणार आहे. उद्या ( 5 आॅक्टोबर) ज्येष्ठ समीक्षक प्रा. पुष्पा भावे यांच्या अध्यक्षतेखाली गज्वी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त गज्वी यांच्याशी साधलेला हा संवाद.
------------------------------------------------------------
नम्रता फडणीस
* या पुरस्कारामागची भावना काय आहे?
- पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच. आपल्या कामाची दखल घेतली जाते यापेक्षा दुसरे समाधान नाटककाराला असू शकत नाही.
* ‘द बुद्धा’ या नाट़यलेखनामागील पार्श्वभूमी काय ?
- ‘द बुद्धा’ हे बुद्धांवरचे चरित्रात्मक लेखन आहे. हे लिहिण्यामागचा हेतू म्हणजे बुद्धांनी सहा वर्षे वैदिक ब्राह्मणी परंपरेने पद्धतीने तपश्चर्या केली. पण त्यांना ज्ञान प्राप्त झाले नाही.अन्नग्रहण केल्यानंतर त्यांना तरतरी आली. पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांनी महिनाभर चिंतन केले. त्यांना जे तत्वज्ञान गवसले त्यासंदर्भावर भाष्य करण्यात आले आहे.
* नाटकाचा आशय काय आहे?
- बुद्धांनी वेगळं काय सांगितले, कारण बोध हा शब्द वैदिक वाडमयात कुठेही नाही. पत्नी यशोधरेला बुद्ध सोडून गेलेले माहिती नाहीत. तिला न सांगताच झोपेत सोडून गेले हा पारंपारिक समज आहे. ते जाणार आहेत हे सगळ्यांना माहिती होते. पत्नीशी बोलून जनव्यवस्थेने सांगितल्यामुळे ते सोडून गेले आहेत. जेव्हा बुद्ध परत येतात तेव्हा यशोधरा त्यांना विचारते, तू ज्ञान मिळवलेस म्हणजे नेमके काय केलेस? तिला सांगण्यापासून नाटकाची मांडणी करण्यात आली आहे.
* बुद्धांचे तत्वज्ञान काय सांगते?
- शांतता, एकमेकांना समजून घेणं, बुद्धीवाद म्हणजे मी सांगतो म्हणून तू मान्य करू नकोस. त्याचं समाधान होईपर्यंत त्याच्या मनातील प्रश्नांचं निरसन करणे, म्हणजे बुद्धतत्वज्ञान आहे. हे चिरकालीन तत्व आहे. जे कालसुसंगत आहे. डॉ. बाबासाहेबांनी बाकीच्या धर्माचा अभ्यास केला होता. पण त्यांना बुद्धांचे तत्वज्ञान पटले. मानवी हिताचे रक्षण करणारा बुद्ध धर्म आहे.
* सध्या समाजात जाती, धर्माचा पगडा वाढत आहे. जगभरात असहिष्णुता, अस्थिरता वाढत चालली आहे, अशा काळात बुद्ध तत्वज्ञान कुठं आहे? त्याची सांगड कशी घालता येईल?
- जगभरात खूपमोठी हानी झाली, हल्ले झाले की देश शांतता कराराची भाषा करू लागतात. पाकिस्तानबरोबर सर्जिकल स्ट्राईक केले तरी चर्चेची भाषा करतो. म्हणजे इथे बुद्ध तत्वज्ञान आलेच. बुद्धाला वगळून जगभर काहीच होत नाही. बुद्ध म्हणजे सदविवेकवादाचा आवाजच आहे. समाजात परिस्थिती हाताबाहेर गेली की बुद्ध आठवतोच.
* लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे असे वाटते का? लेखनासाठी सध्याचे वातावरण पोषक आहे का?
-लेखकांची मुस्कटदाबी होतच आहे. एखाद्या हुकुमशाही करणा-या व्यक्तीबद्द्ल लिहिले तर तो त्याला कारागृहातच पाठवणार ना? पण बुद्धाचा विवेकवादाचा आवाज असेल तर त्याचे मत आहे आणि त्याचा सन्मान आहे, असा विचार तो व्यक्ती करेल त्यातूनच दोघांमध्ये समन्वय निर्माण होईल. मात्र सध्याच्या काळात माझा कुठलाही प्रकारे पराभव होता काम नये. या मानसिकतेतूनच दंगे, धोके निर्माण होतात. तरीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहाणारच आहे. व्यक्तीला संपवल्याने विचार संपत नाहीत. गांधीजींची हत्या केली तरी त्यांचे विचार कुणी संपवू शकलेले नाही. इथेही बुद्धच कामाला येतात. बुद्ध म्हणतात, कुठल्याही तारेतून सूर उत्तम उमटायचा असेल तर ती तार जोरात खेचली तर तुटते आणि ढिली सोडली तर सूर उमटत नाहीत, म्हणून ती अशाप्रकारे तार इतकीच खेचली गेली पाहिजे की त्यातून सूर छान उमटतील. जगण्याचे तसेच आहे. जागतिक स्तरावरही ही तार कमी जास्त ओढली जाते तेव्हा संघर्ष होतोच.