बुद्धलेण्यांचा समावशे सर्किट योजनेत करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:12 AM2021-02-26T04:12:51+5:302021-02-26T04:12:51+5:30
खोडद : भारतीय पुरातत्व विभागाकडून जुन्नर तालुक्यात असलेल्या बुद्धलेण्यांचे संवर्धन व जतन केले जावे व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध ...
खोडद : भारतीय पुरातत्व विभागाकडून जुन्नर तालुक्यात असलेल्या बुद्धलेण्यांचे संवर्धन व जतन केले जावे व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे तत्काळ प्रस्ताव पाठवावेत. राज्य सरकारकडून प्रस्ताव गेल्यानंतर या लेण्यांचा समावेश सांस्कृतिक मंत्रालयाच्या बुद्धिस्ट सर्किट योजनेत करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयात पाठपुरावा करणार असल्याची माहिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
याबाबतचे निवेदन डॉ. कोल्हे यांनी राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना दिले आहे.
जुन्नर तालुक्यात सुमारे २२० लेण्या आहेत. जुन्नर शहरापासून काही अंतरावर शिवनेरी, तुळजा, मानमोडी, लेण्याद्री व सुलेमान या गटांमध्ये विभागल्या आहेत. तुळजा लेणी ही महाराष्ट्रातील आद्य लेण्यांपैकी एक आहे. हा लेण्यांचा समूह भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे.
जुन्नर हे महाराष्ट्रातील प्राचीन शहरांपैकी एक शहर आहे. जुन्नर तालुक्यात २ हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वाधिक बुद्धलेण्या कोरलेल्या आहेत. या लेण्यांच्या विकासासाठी व संवर्धनासाठी पुरातत्व विभागाने कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. देश व विदेशातील अनेक पर्यटक व लेणी अभ्यासक या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी येथे येत आहेत. मात्र पुरातत्व विभागाकडून या लेण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
जुन्नरपासून काही अंतरावर असलेल्या सोमतवाडी जवळील ही बुद्धलेणी (तुळजा लेणी) संपूर्ण भारतात एकमेव आणि दुर्मिळ अशी आहे. या लेणीमधील बुद्धस्तुपाची रचना वेगळी आहे. या स्तुपाभोवती १२ दगडी खांब असून अशी रचना कोठेही पाहायला मिळत नाही. देशभरातून व देशाबाहेरून देखील अनेक लेणी अभ्यासक व पर्यटक या लेणींना भेट देण्यासाठी येत आहेत.
बुद्धलेणी स्थापत्य, चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकलेचा भारताच्या संस्कृतीवर ठसा आहे. ही कला भारताची अनुपम कला व समृद्ध बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडवते. त्यामुळे या बुद्धलेण्यांचा विकास व त्यांचे संवर्धन करून त्या जतन करण्यासाठी तसेच बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासकांना अभ्यास करण्यासाठी त्यांचा समावेश केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या बुद्धिस्ट सर्किट योजनेत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.
२५ खोडद लेणी
महाराष्ट्रातील आद्य लेण्यांपैकी एक सोमतवाडी येथील बुद्धलेणी.