विद्यापीठात ‘बौद्ध वारसा आणि पर्यटन’ अभ्यासक्रम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:01+5:302021-01-19T04:13:01+5:30

पुणे: विद्यार्थ्यांना आशिया खंडातील दक्षिण पूर्व राष्ट्रांमधील बौद्ध संस्कृती आणि वारसा, चित्रकला, स्थापत्यकलेचा अभ्यास करता यावा. तसेच त्यातून विद्यार्थ्यांना ...

‘Buddhist Heritage and Tourism’ course started at the university | विद्यापीठात ‘बौद्ध वारसा आणि पर्यटन’ अभ्यासक्रम सुरू

विद्यापीठात ‘बौद्ध वारसा आणि पर्यटन’ अभ्यासक्रम सुरू

Next

पुणे: विद्यार्थ्यांना आशिया खंडातील दक्षिण पूर्व राष्ट्रांमधील बौद्ध संस्कृती आणि वारसा, चित्रकला, स्थापत्यकलेचा अभ्यास करता यावा. तसेच त्यातून विद्यार्थ्यांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन अभिमत विद्यापीठाने ‘बौद्ध वारसा आणि पर्यटन’ हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. विद्यापीठाच्या पाली विभागातर्फे या अभ्यासक्रम प्रवेश दिला जाणार आहे. हा अभ्यासक्रम दीड वर्षाचा असून त्यातील सहा महिने विद्यार्थ्यांना वारसा आणि पर्यटन या क्षेत्राचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘बौद्ध वारसा आणि पर्यटन ’या अभ्यासक्रमात बौद्ध कला, स्थापत्य, जागतिक वारसास्थळे, पर्यटनशास्त्र, बौद्ध वाङ्मय, तत्त्वज्ञान, भारतीय बौद्ध स्थळे आदी विषयांचा समावेश केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी विविध विषयांचा अभ्यास करता येईल.

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे डॉ. श्रीकांत गणवीर म्हणाले, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांतील अनेक महत्त्वाची प्राचीन बौद्ध स्थळे अजूनही पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहेत. अजूनही जपान, चीन, श्रीलंका, थायलंड आदी बौद्धधर्मीयबहुल राष्ट्रांतील पर्यटक काही मोजकी प्राचीन बौद्धस्थळे वगळता अनेक महत्त्वाच्या स्थळांना भेट देत नाहीत.

विदेशी पर्यटकांना दुर्लक्षित प्राचीन बौद्ध वारशाची माहिती होणे गरजेचे आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमातून बौद्ध सांस्कृतिक वारसास्थळांच्या पर्यटनाला भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना मिळेल.

Web Title: ‘Buddhist Heritage and Tourism’ course started at the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.