चर्चेतून उलगडणार अंदाजपत्रक
By admin | Published: May 16, 2017 07:03 AM2017-05-16T07:03:58+5:302017-05-16T07:03:58+5:30
महापालिकेच्या सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या तब्बल ५ हजार ९१२ कोटी अंदाजपत्रकावरील चर्चा मंगळवारपासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रंगेल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या तब्बल ५ हजार ९१२ कोटी अंदाजपत्रकावरील चर्चा मंगळवारपासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रंगेल. विरोधकांनी आपल्या तोफा तयार केल्या असून, सत्ताधारीही आपल्या योजनांच्या समर्थनार्थ तयारीत आहेत. ४ दिवस तरी ही चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
अंदाजपत्रकाला दरवर्षीच्या नियोजित वेळेपेक्षा या वर्षी बराच विलंब झाला आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमताने सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीचे हे पहिलेच अंदाजपत्रक आहे. ५ हजार ९१२ कोटी अशा विक्रमी आकड्याचे ते आहे. स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त कुणाल कुमार यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात वाढ करून ते तयार केले आहे. वाढ करताना त्यांनी बांधकाम विभाग, मिळकतकर विभाग, स्थानिक संस्था कर यांच्यातून अवाजवी उत्पन्न अपेक्षित धरले असल्याचे दिसते आहे.
विरोधकांचा सर्वांत जास्त मारा त्यावरच होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची अंदाजपत्रकाच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी म्हणून सोमवारी संयुक्त बैठक झाली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, सभागृहातील सर्वाधिक ज्येष्ठ नगरसेवक असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल, दीपक मानकर अशी बरीच मोठी फौज विरोधकांकडे आहे. त्यामुळेच त्यांनी अंदाजपत्रकातील कमकुवत दुवे हेरून त्यावरच जोर देण्याचे ठरवले असल्याची माहिती मिळाली.
सत्ताधारी भाजपाकडे १०१ नगरसेवकांचा ताफा असला तरी त्यातील बरेचसे अनुनभवी आहेत. त्यामुळे अंदाजपत्रकाबाबत त्यांच्यातील बरेसचे गोंधळलेलेच आहेत. त्यांचे हे गोंंधळलेपण दूर करण्यासाठी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मोहोळ यांनी सर्व नगरसेवकांची बैठक सोमवारी घेतली. त्यात विरोधकांना कोणी प्रत्युत्तर द्यायचे याचे नियोजन करण्यात आले. स्विकृत नगरसेवकांमध्ये गणेश बीडकर यांचा समावेश असल्याने ती भाजपाकडे जमेची बाजू आहे.