जुन्या आराखड्यानुसारच रिंग रोडची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:16 AM2021-08-25T04:16:09+5:302021-08-25T04:16:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शेतकऱ्यांना देशोधडीला लावून केलेला विकास आम्हाला अमान्य आहे. जुन्या आराखड्यानुसारच रिंग रोड करा, जर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतकऱ्यांना देशोधडीला लावून केलेला विकास आम्हाला अमान्य आहे. जुन्या आराखड्यानुसारच रिंग रोड करा, जर तुम्ही तसे करणार नसाल तर आमचा कडवा विरोध असेल, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंगळवारी पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या वेळी आमदार भीमराव तापकीर, तसेच सिंहगड खोऱ्यातील मुठा, सांगरुण, कातवडी, वरदाडे, खामगाव मावळ, शिवगंगा खोऱ्यातील खोपी, कांजले, केलवडे व भोर येथील अल्पभूधारक शेतकरी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रिंगरोडचा जो आराखडा तयार केला होता. त्यात शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होत नव्हता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने काही जणांचे हित डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला आहे. अशाप्रकारे विकासकामे राबवली जाणार असतील तर ते आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे प्रस्तावित आराखडा रद्द करावा. अन्यथा, आमचा कडवा विरोध असेल अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
---
सरकारचे वागणे ‘हम करे सो कायदा’
विद्यमान सरकार ‘हम करे सो कायदा’ या भूमिकेत वागत आहे. त्यामुळे सातत्याने विकासाभिमुख प्रकल्प तयार करण्याऐवजी, काही जणांचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत आहे. राज्य सरकारच्या या धोरणामुळे जनता देखील त्रस्त आहे. आगामी काळात जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.