शौचालय बांधा; अन्यथा वीज, पाणी, रेशन बंद
By admin | Published: August 23, 2016 08:56 PM2016-08-23T20:56:03+5:302016-08-23T20:56:03+5:30
३० सप्टेंबरपर्यंत वैयक्तिक शौचालये नसलेल्या लाभार्थ्यांवरही आता कारवाई होणार आहे. २ आॅक्टोबरनंतर त्यांचे वीज, पाणी कनेक्शन बंद करण्याबरोबर रेशनही बंद करण्यात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २३ : ३० सप्टेंबरपर्यंत वैयक्तिक शौचालये नसलेल्या लाभार्थ्यांवरही आता कारवाई होणार आहे. २ आॅक्टोबरनंतर त्यांचे वीज, पाणी कनेक्शन बंद करण्याबरोबर रेशनही बंद करण्यात येणार आहे. शासनाने या वर्षी दहा जिल्हे हगणदरीमुक्त करण्याचे ठरवले असून यात पुणे जिल्हाही आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यादृष्टीने काम सुरू केले असून गेल्या चार महिन्यांत वेगाने काम सुरू आहे. तरीही आजच्या तारखेला १ लाख ७४५ शौचालये बांधणे बाकी आहेत. जिल्हा ३१ डिसेंबरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचे ठरविले असले तरी ३० सप्टेंबरपर्यंतच ते टार्गेट पूर्ण करण्याचे ठरविले आहे.
यापूर्वी जर कोणत्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्याकडे शौचालय नसेल तर त्यांचे पद रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले होते. आता १५ आॅगस्टला सर्व ग्रामपंचायतींत ग्रामसभा घेऊन वैयक्तिक शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात आले. ३० सप्टेंबरपर्यंतबांधकाम पूर्ण न झाल्यास २ आॅक्टोबरपासून संबंधित लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
यात त्याला ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचे दाखले मिळणार नाहीत, शासनाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या वैैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी शिफारस करण्यात येणार आहे, या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यात येऊ नये, याबाबत तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँका यांना कळविण्यात येणार आहे. या कुटुंबांची नावे गावात दर्शनी भागात फ्लेक्सवर लावण्यात येणार असून वर्तमानपत्रातही प्रसिद्ध केली जाणार आहेत.
रेशनकार्डवर धान्य, साखर आणि रॉकेल बंद केले जाणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आलेले पाणी नळजोड तोडण्यात येणार असून वीज तोडण्याबाबत महावितरण कंपनीस कळविण्यात येणार आहे, असे ग्रामसभेचे ठराव करून संबंधितांना तशी नोटीसही दिली जाणार आहे. ग्रामसभेची मान्यता घेतल्यानंतर वरील सर्व कारवाई केली जाणार आहे.
घरभेटी आणि बँडपथक
हगणदरीमुक्तीसाठी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत गृहभेट अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २२ हजारांहून जास्त जिल्हा परिषद कर्मचारी स्वच्छ भारत मिशनसाठी गावपातळीवर कार्य करीत आहेत. शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्त्व सांगितले जाणार आहे. २ आॅक्टोबर २०१६ रोजी याच अभियानाचा भाग म्हणून एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये गृहभेट आणि स्वच्छता उपक्रम करून राज्यात महास्वच्छता दिन साजरा केला जाणार आहे. तसेच आता ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांच्या घरी २ आॅक्टोबरपासून बँड व हलगीपथक जाऊन वाजविण्यात येणार आहे.
भोर, वेल्हेसाठी मुदत वाढविली
१५ आॅगस्टला भोर, वेल्हा हगणदरीमुक्त करणार असल्याची घोषणा यापूर्वी प्रशासनाने केली होती. मात्र दरम्यानच्या काळात या तालुक्यात जास्त पाऊस असल्याने तेथील प्रशासनाने आणखी थोडा अवधी मागितला आहे. भोर तालुक्यात फक्त १४३, तर वेल्हे तालुक्यात २९६ शौचालये बांधणे बाकी आहे.
तालुक्यानुसार शौचालय नसलेली कुटुंबे
इंदापूर : २५५०७
दौंड : १२७०१
बारामती : १२७५६
खेड : ८७६३
मावळ : ८८९९
शिरूर : ८८९२
जुन्नर : ७७०१
हवेली : ४५५४
आंबेगाव : ५३७१
पुरंदर : ५२३३
भोर : १४३
वेल्हा :२१६
एकूण : १००७४५