पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची छतावरुन उडी घेऊन आत्महत्या; कोथरूडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 08:14 PM2020-07-02T20:14:18+5:302020-07-02T21:37:26+5:30
नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय
पुणे : कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाने राहत्या इमारतीच्या छतावरून उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना कोथरूडमधील आशिष गार्डन परिसरातील मुक्ताई सोसायटीत गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
रामचंद्र लक्ष्मणराव बबलतकर (वय ५५) असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. कोथरूड पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलतकर हे मूळचे सोलापूरचे राहणारे आहेत. तेथे त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. कोथरूडमधील मुक्ताई सोसायटीत ते पत्नी आणि मुलासमवेत रहात होते. मागील दोन वर्षांपासून ते मधुमेहाने त्रस्त होते. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास बबलतकर हे इमारतीच्या छतावर गेले होते. छतावरून कोणी पडू नये, म्हणून सोसायटीने तिथे जाळी लावली आहे़ बबलतकर यांनी जाळी काढून छतावरून सोसायटीच्या आवारातील मोकळ्या जागेत उडी मारली. खाली पडताना झालेल्या आवाजामुळे लोकांनी खाली पाहिले असता बबलतकर हे पडलेले आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी पोहचले़ त्यांनी बबलतकर यांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. बबलतकर यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाहीत. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय आहे. कोथरूड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेले आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना.नऱ्हे येथील एका २० वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर काही तासाने शहरातील आत्महत्येचा हा दुसरा प्रकार समोर आला आहे.