बिल्डरकडून तब्बल ५० प्लॅटधारकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:45 PM2018-04-28T13:45:36+5:302018-04-28T13:45:36+5:30
टस्कॉन कन्स्ट्रो प्रा. लि. व एस. आर. डी. एच. बिल्डर्स कन्स्ट्रक्शन पिसोळी कंपनीची स्थापना करत त्यात फिर्यादींसह इतर ५० ते ६० जणांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुणे : पिसोळी येथील एका गृहप्रकल्पात फ्लॅट घेणा-या तब्बल ५० जणांना बिल्डरने लाखो रुपयांना गंडा घालत त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यासाठी बिल्डरने बनावट कंपनी देखील स्थापन केली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित राजन कुलकर्णी (वय ३६, रा. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हेमंत तुकाराम बुद्धीवंत (महम्मदवाडी) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित कुलकर्णी हे मूळचे पुण्यातील असून ते नोकरीनिमित्त मुंबईत असतात. २०१५ मध्ये त्यांना पुण्यात घर घ्यायचे होते. त्यावेळी त्यांना टस्कॉन कन्स्ट्रो प्रा. लि. व एस. आर. डी. एच. बिल्डर्स पिसोळी येथे रोझ पॅरेडाईज नावाचा गृहप्रकल्प उभारणार असल्याची माहिती मिळाली होती. प्रकल्पाची त्यांनी साईटवर जाऊन माहिती घेतली. त्यावेळी त्यांना शंभर फ्लॅटचा हा गृहप्रकल्प असून, त्यातील ५० फ्लॅट बुक झाल्याचे सांगण्यात आले होते. साईट आवडल्याने त्यांनी प्रकल्पातील बी-१६ क्रमांकाचा रो हाऊस ५५ लाख रुपयांना बुक केला. त्याचे दहा लाख रुपये चेकद्वारे दिले. त्यानंतर २०१६ मध्ये सामंजस्य करार केला. बुकींग झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी फिर्यादी गृहप्रकल्पाकडे गेले. त्यावेळी तेथे कोणतेही काम सुरू नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत कंपनीच्या कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगितले. परंतु, अनेक दिवसांनीही प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. त्यांनी बिल्डर हेमंत बुद्धीवंत यांच्याशी संपर्क साधला. मात्र, संपर्क झाला नाही. याप्रकरणी अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
....................
बनावट कंपनीची स्थापना
संबंधित जागा ही हेमंत बुद्धीवंत यांच्या नावावर नसून त्यांनी बनावट टस्कॉन कन्स्ट्रो प्रा.लि. आणि एस. आर. डि. एच. कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली. त्याद्वारे रोझ पॅरेडाईज नावाचा बनावट गृहप्रकल्प तयार करून फिर्यादींसह इतर ५० ते ६० जणांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.