अभिहस्तांतरण न करून दिल्याने बिल्डरविरुद्ध गुन्हा
By admin | Published: November 18, 2016 05:09 AM2016-11-18T05:09:48+5:302016-11-18T05:09:48+5:30
टिंगरेनगर येथील अक्षय हेरिटेज को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या सभासदांना कन्व्हीन्स डीड (अभिहस्तांतरण पत्र) करून न दिल्याप्रकरणी
पुणे : टिंगरेनगर येथील अक्षय हेरिटेज को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या सभासदांना कन्व्हीन्स डीड (अभिहस्तांतरण पत्र) करून न दिल्याप्रकरणी बिल्डर मनोज अगरवाल व कमलाबाई गर्ग यांच्याविरुद्ध मोफा अॅक्ट अन्वये विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय हेरिटेज कोआॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजू औटी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. बिल्डरने सोसायटीच्या स्वच्छतागृहाच्या जागेत अनधिकृतपणे व्यापारी गाळे बांधले, याप्रकरणी महापालिकेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर, पालिकेने कारवाई करून ते अनधिकृत बांधकाम पाडून टाकले. मात्र, बिल्डरने पुन्हा त्याठिकाणी बांधकाम केले.
करारानुसार बिल्डरने सोसायटीला अभिहस्तांतरण पत्र करून देणे आवश्यक होते, मात्र त्याने हे अभिहस्तांतरण करून देण्यास टाळाटाळ केली. फ्लॅटच्या रचनेत बदल करताना सोसायटीची कोणतीही परवानगी घेतली नाही, अशी तक्रार विश्रांतवाडी पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार मोफा अॅक्ट १९६३ अन्वये पोलिसांनी बिल्डरविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेने सोसायटीचा मंजूर केलेला अंतिम मंजूर प्लॅन मिळण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला असता, रेकॉर्ड विभागात सदर प्रकरणाचा आढळ होत नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले आहे, त्याबाबतही राजू औटी यांनी शंका उपस्थित केली आहे.(प्रतिनिधी)