बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:41 PM2024-05-24T12:41:04+5:302024-05-24T12:44:32+5:30
Pune Porsche Car Accident Case Update: बिल्डरचा बाळ दारु पिऊन गाडी चालवत होता. त्याने कल्याणीनगरमध्ये दोघांना उडविले यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर जमावाने कार चालविणाऱ्या बाळाला पकडून चांगला चोप दिला. आता हा बाळ आणि बिल्डर म्हणतोय की ड्रायव्हर गाडी चालवत होता.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण आता वेगवेगळे वळण घेत आहे. कार आपला अल्पवयीन मुलगा नाही तर ड्रायव्हर चालवत होता, असा दावा बिल्डर विशाल अग्रवालने केला होता. आता त्याच्या आरोपी मुलानेही तीच री ओढत गरीब ड्रायव्हरला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ड्रायव्हरने पोलिसांना आधीच बिल्डरचे लाडके बाळ गाडी चालवत असल्याचा जबाब दिला आहे. आपली मानगुट सोडविण्यासाठी ड्रायव्हरला खोटे पाडण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. अशातच पोलिसांनी बाळच गाडी चालवत होता याचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
बिल्डरचा बाळ दारु पिऊन गाडी चालवत होता. त्याने कल्याणीनगरमध्ये दोघांना उडविले यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर जमावाने कार चालविणाऱ्या बाळाला पकडून चांगला चोप दिला. या बाळाला सोडविण्यासाठी एका फोनवर आमदार पोलीस ठाण्यात हजर झाला. १५ तासांत बिल्डर बाळाला निबंध लिहिण्याच्या आणि १५ दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत राहून वाहतूक नियमन करण्यासारख्या हास्यास्पद अटी घालण्यात आल्या होत्या. यावरून पुण्यासह महाराष्ट्रभरात जनक्षोभ उसळला होता. यानंतर पोलीस प्रशासनाने नाचक्की होतेय हे पाहून धावाधाव करण्यास सुरुवात केली होती.
आता रिअल इस्टेट क्षेत्रातील बडी आसामी असलेल्या व राजकीय क्षेत्रात मोठे वजन असलेल्या या अग्रवाल कुटुंबाविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यावर पोलिसांना व केस भरकटविण्यासाठी अग्रवालांकडे काही हजार रुपयांच्या पगारात नोकरी करणाऱ्या ड्रायव्हरला गोवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
बिल्डरनंतर आता त्याच्या बाळानेही अपघात झाला तेव्हा मी नाही तर ड्रायव्हर कार चालवत होता असा दावा केला आहे. आज या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी संपत आहे. बिल्डर त्या रात्री पोलीस ठाण्यात येऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होता. यासाठी त्याने राष्ट्रवादीच्या आमदारालाही बोलावले होते. परंतु प्रकरण तापल्याचे पाहून बिल्डर छत्रपती संभाजीनगरला पळाला होता. तिथून पोलिसांनी त्याला अटक केली होती.
पोलिसांनी या दाव्यामुळे अग्रवालचे घर ते बार व जिथे जिथे ही कार गेली होती त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. फॉरेन्सिक पथकाकडून गाडीची तपासणी करण्यात आली आहे. ड्रायव्हरचा जबाब नोंदविला आहे. यात बाळाने जेव्हा गाडी चालविण्यास मागितली तेव्हा ड्रायव्हरने मालकाला फोन करून विचारणा केली होती. यावर मालकाने आपल्या बाळाला गाडी चालवायला दे असे सांगितले होते, असा जबाब नोंदविण्यात आला आहे. बिल्डर मालकाच्या सांगण्यावरून मुलाला गाडी चालवायला दिल्याचेही या ड्रायव्हरने यात म्हटले होते. या प्रकरणात आता पोलीस ड्रायव्हरलाच न्यायालयात साक्षीदार म्हणून हजर करणार आहेत.