बिल्डरने फसविल्याने रहिवासी संतप्त
By admin | Published: May 15, 2014 05:12 AM2014-05-15T05:12:57+5:302014-05-15T05:12:57+5:30
पाणी, वीज जोडीसह विविध सुविधांबाबत वंचित ठेवून फसवणूक करणार्या बिल्डर विरोधात सदनिकाधारकांनी फ्लेक्स व पत्रके वाटून जनजागृती मोहीम राबविली आहे.
पिंपरी : पाणी, वीज जोडीसह विविध सुविधांबाबत वंचित ठेवून फसवणूक करणार्या बिल्डर विरोधात सदनिकाधारकांनी फ्लेक्स व पत्रके वाटून जनजागृती मोहीम राबविली आहे. बिल्डर व आर्किटेक्टवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी स्पाइन रस्ता, चिंचवड येथील रॉयल रेसिडेन्सीतील त्रस्त रहिवाशांनी पत्रकार परिषदेत केली. जिजाऊ पार्क येथे ही चार मजल्यांची इमारत आहे. एकूण १८ सदनिकाधारक असून, १७ कुटुंब येथे वास्तव्यास आहेत. पूर्ण रक्कम अदा केल्यानंतर बिल्डरने सदनिकेच्या चाव्या दिल्या. आठ महिन्यांपूर्वी ते राहण्यास आले. मात्र, तेथे पिण्याचे पाणी व विजेचे स्वतंत्र जोड नव्हते. पाणी नसल्याने ते विकत आणावे लागते आहे. गेल्या आठवड्यात तळमजल्यावर अर्धा इंची नळजोड घेतला असून, वरच्या मजल्यावरून पाण्याची ने-आण करावी लागत असल्याची तक्रार संभाजी शिंदे यांनी केली. पूर्ण क्षमतेने व स्वतंत्र वीजजोड नसल्याने वारंवार शॉटसर्किट होऊन इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान होत आहे. तसेच, काही छतातून गळती होत आहे. लिफ्ट बंद आहे. दरवाजे, खिडक्या व इतर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी संदीप पटेकर, हेमंत सावंत, प्रदीप पाटील, ब्रीजलाल पाटील आदी उपस्थित होते. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला अद्याप दिलेला नाही. वॅट व टॅक्सचा रकमेचा तपशील दिलेला नाही. फेरफार केलेल्या प्लॅनची सुधारीत आवृत्ती घेतली नाही. एनए आॅर्डर न घेता बिल्डरने बांधकाम पूर्ण केले असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. यासह असंख्य तक्रारी त्यांनी केल्या. तसेच, बांधकाम पूर्ण झालेले नसताना पूर्णत्वाचा दाखला देणार्या आर्किटेक्टवरही कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात बिल्डरला वारंवार भेटून व दूरध्वनीवरून संपर्क साधूनही उडवाउडवीच्या उत्तराशिवाय काहीच कामे केली गेली नाही. सध्या संपर्कही होत नसून, मोबाइल नॉटरिचेबल लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनी आपल्या कक्षात हा प्रकार येत नसून ग्राहक मंच किंवा न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून याबाबत कोणतेच उत्तर दिले जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. संपूर्ण रक्कम अदा करूनही सेवा व सुविधा न पुरवून फसवणूक केल्याबद्दल बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करून रहिवाशांच्या अडचणी दूर करण्यात यावा, अशी त्यांची आग्रही मागणी आहे. (प्रतिनिधी)