बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:29 AM2024-05-20T11:29:18+5:302024-05-20T11:30:21+5:30

मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर त्याने निबंध लिहावा, भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास मदत करावी असे सांगत जमीन मंजूर

Builders son granted bail within hours If the life is gone it remains aside the punishment is ridiculous | बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच

बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच

किरण शिंदे

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन पोराने शनिवारी मध्यरात्री बेदरकारपणे आलिशान कार चालवत दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोश्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन कारचालकाला नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला होता. त्यानंतर त्याला पोलिसाच्या हवाली करण्यात आले. पुणेपोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून कोर्टात हजरही केलं होतं. मात्र कोर्टाने काही अटी शर्ती घालून देत त्याला लगेच जामीनही दिला.

भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणारा कारचालक अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. म्हणून गुन्हा दाखल करताना त्याच्याविरोधात जामीनपात्र कलमं लावण्यात आली. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात त्याला जामीनही मिळालाय. याशिवाय आरोपी कारचालकानं पंधरा दिवस ट्राफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभे राहून वाहतुकीचं नियोजन करावं, दारू सोडवण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर त्याने निबंध लिहावा, भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास मदत करावी असं न्यायालयाने त्याला जामीन देताना सांगितलं..

दरम्यान या अपघातात मृत्युमुखी पडलेला अनिस दोन दिवसांपूर्वीच परदेशातून पुण्यात आला होता. शनिवारी रात्री पार्टी करण्यासाठी तो मैत्रिणी सोबत गेला होता. पार्टी करून परत जात असतानाच त्याच्या दुचाकीला भरधाव पोर्षे गाडीने धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी वर पाठीमागे बसलेली अश्विनी कोष्टा दहा ते पंधरा फूट हवेत फेकली गेली आणि खाली पडली.. डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर अनिश अवधिया समोरील चारचाकी गाडीवर जाऊन आदळला. यामध्ये त्याच्या बरगड्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आता पुणे पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप होतोय.. अल्पवयीन चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता की नाही हे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळण्यास मदत झाल्याचा आरोप होतोय. त्यामुळे या भीषण अपघाताने पुणे शहर हादरलेला असतानाच या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि न्यायालयाने सुनावलेली शिक्षा ऐकून सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: Builders son granted bail within hours If the life is gone it remains aside the punishment is ridiculous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.