बुलडाणा बँक मदतीबाबत संभ्रमात;डीएसकेप्रकरणी आज सुनावणी, मालमत्तेवर बोजामुळे अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 05:43 AM2018-02-16T05:43:47+5:302018-02-16T05:44:05+5:30
बुलडाणा अर्बन बँक पुढाकार घेऊन डीएसकेंच्या मदतीला धावली आणि त्यांनी त्यांच्या मालमत्ता खरेदी करण्याची तयारी उच्च न्यायालयात दर्शविली होती. असे असले, तरी त्यांच्या सर्व मालमत्तांवर कर्जे असून, त्या बोजाविरहित नसल्याचे बँकेला समजले असल्याने बुलडाणा अर्बन बँकेच्या अध्यक्षांसह संचालकही संभ्रमात पडले आहेत.
पुणे : बुलडाणा अर्बन बँक पुढाकार घेऊन डीएसकेंच्या मदतीला धावली आणि त्यांनी त्यांच्या मालमत्ता खरेदी करण्याची तयारी उच्च न्यायालयात दर्शविली होती. असे असले, तरी त्यांच्या सर्व मालमत्तांवर कर्जे असून, त्या बोजाविरहित नसल्याचे बँकेला समजले असल्याने बुलडाणा अर्बन बँकेच्या अध्यक्षांसह संचालकही संभ्रमात पडले आहेत. दरम्यान याप्रकरणी उच्च न्यायालयाने २२ डिसेंबर ऐवजी तातडीने १६ डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे.
डी़ एस़ कुलकर्णी यांना उच्च न्यायालयात ५० कोटी जमा करण्यात अपयश येत असल्याने, त्यांनी बुलडाणा अर्बन बँकेकडे मदतीची विनंती केली होती़ त्यानुसार बँकेने डीएसकेंजवळ असलेल्या १२ कोटींच्या विकण्यायोग्य मालमत्ता विकत घेण्याची तयारी मंगळवारी बँकेने उच्च न्यायालयात दर्शविली होती़ त्यानंतर बँकेने डीएसकेंना काही अटीवर १०० कोटी देण्याची तयारी दर्शविली याबाबत बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सांगितले की, डीएसके यांनी उच्च न्यायालयात सादर केलेला १२ कोटींचा
प्लॉट आम्ही विकत घेणार होतो. परंतु, पोलिसांनी या मालमत्तेवर अगोदरच बँकांचा बोजा असल्याची कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत़ डीएसके यांच्या विना बोजा असलेली २०० कोटी रुपयांची मालमत्ता बँक खरेदी करेल़ त्याबदल्यात डीएसके यांच्या १०० कोटी रुपयांच्या ठेवीदार बुलढाणा बँकेकडे हस्तांतर करणार आहे़ या ठेवीदारांना २ वर्षे या ठेवी काढता येणार नाहीत़ त्यांना बँक साडेआठ टक्के व्याज देणार आहे़ या दोन वर्षात डीएसके यांनी आमचे पैसे व्याजासह फेडले तर त्यांची मालमत्ता त्यांना परत करण्यात येईल़ नाही तर तिच्यावर बँकेचा हक्क कायम होईल़ ती मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देण्यात येतील़ दरम्यानच्या काळात ही मालमत्ता बँकेच्या ताब्यात राहणार आहे़ डीएसके जी मालमत्ता बोजारहीत असल्याचे दाखवितात़ त्या अॅमिनिटी प्लेस आहेत़ त्यावर आम्ही शाळा, हॉस्पिटल, हॉस्टेल बांधू शकतो़ यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध होताच पुण्यातून अनेक मेसेज, फोन आम्हाला येऊ लागले आहेत़ त्यांच्या कोणत्याच मालमत्ता बोजाविरहीत नसल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे़ त्यामुळे आम्ही सर्व जण संभ्रमात पडलो असून २२ फेब्रुवारीला उच्च न्यायालय काय निर्णय घेते, यावर पुढे काय करायचे हे बँक निश्चित करणार असल्याचे चांडक यांनी सांगितले.