न्यायालयीन बंदी झुगारून पुन्हा बैलगाडा शर्यतीचा थरार ; खेड तालुक्यात ५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 08:31 PM2020-11-23T20:31:04+5:302020-11-23T20:35:55+5:30
बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी
राजगुरुनगर: न्यायालयीन बंदी झुगारून तिन्हेवाडी (ता. खेड )येथे घाटात बैलगाडागाडा शर्यती भरविल्याप्रकरणी खेडपोलिस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी जमवून कोरोनासाठी आमंत्रण देत आहे काय? असा प्रश्न नागरिकांना या शर्यतीमुळे पडला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शेखर चिमणा भोईर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्राण्यांना निर्दयीपणे वागवुन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन नियमांचे उल्लघन करून तिन्हेवाडी बैलगाडा घाटात गर्दी जमविल्याबद्दल खेड पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण राघू थिगळे , निलेश चंद्रकांत पाठरे , धोंडीभाऊ बबन आरूडे ,संतोष शिवाजी आरुडे, नानाभाऊ सहादु आरुडे ( सर्व रा. तिन्हेवाडी ता. खेड ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत .
तिन्हेवाडी ( ता. खेड ) येथे रविवार (दि. २२ ) रोजी न्यायालनाने घातलेली बैलगाडा शर्यतीवरील बंदी झुगारुन बैलगाडे सकाळी ७ वाजल्यापासुन पळविण्यात येत होते. या शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा मालक व बैलगाडा शौकीनांनी घाटात मोठी गर्दी केली होती. मात्र यांची कुणकुण पोलिसांना लागताच खेड पोलिसांनी घाटात जाऊन सुरू असलेल्या शर्यती बंद केल्या.