बंदी असतानाही पुरंदर तालुक्यात रंगली बैलगाडा शर्यत; बघायला तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 05:46 PM2020-10-05T17:46:40+5:302020-10-05T18:06:37+5:30
आयोजकांवर गुन्हा दाखल
पुरंदर : राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. मात्र असे असतानाही पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथे बैलगाडा शर्यत भरवल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच ही शर्यत पाहायला बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. याप्रकरणी सासवड पोलिसांनी या शर्यतीचे आयोजन करणाऱ्यांवर चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी आणि कुंभारवळण या गावच्या सीमेवर वनपुरी गावच्या हद्दीमध्ये गट नंबर २५० इथे विनापरवाना बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजकांकडून शर्यतीच्या निर्बंधांबाबत आदेशाचे उल्लंघन केले. त्याचबरोबर बैलांना शर्यतीसाठी पळवून त्यांना क्रूरतेने वागणूक दिली. याठिकाणी बघ्यांची शेकडोंच्या संख्येने गर्दी जमल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सलाही हरताळ फासण्यात आला. त्यामुळे कोरोना पसरविण्यासाठी आहे.मदत केल्याचा ठपका ठेवत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र उर्फ बाबा हरिश्चंद्र जगताप, सुनील तानाजी कुंभारकर, चंद्रकांत प्रकाश शिंदे, शुभम राजेंद्र जगताप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
कोरोनाच्या काळात त्याचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत केल्याचा ठपका ठेवत सासवड पोलिसांनी ४ जणांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक डी.एस. हाके हे करीत आहेत.