अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलेटस्वाराचा मृत्यू; पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 20:15 IST2025-03-27T20:15:07+5:302025-03-27T20:15:35+5:30
अपघातानंतर अज्ञात वाहन व अज्ञात चालक कुठली खबर न देता पळून गेला

अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलेटस्वाराचा मृत्यू; पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील घटना
शिरूर : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर येथील सतरा कमानी पुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलेटस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 26) रात्री घडली. सोमेश्वर बबन पाचर्णे (वय ३२, रा. पाचर्णेमळा तर्डोबाचीवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) हा या अपघातात मरण पावला आहे. याबाबत बाळू शंकर पाचर्णे (पाचर्णेमळा तर्डोबाचीवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे, २६ मार्च रोजी रात्री अकरा वाजता सोमेश्वर पाचर्णे हा त्याची बुलेट मोटारसायकल वरून पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अहिल्यानगरच्या बाजूने जात होती. शिरूर सतरा कमान पुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या बुलेट मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात बुलेट चालक सोमेश्वर याच्या डोक्याला व हातापायांना गंभीर मार लागल्याने याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन व अज्ञात चालक कुठली खबर न देता पळून गेला आहे. याबाबत फिर्यादीवरून अज्ञात वाहन व त्याचा चालक याच्या विरोधात शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दीपक राऊत करीत आहे.