बुलेट ट्रेन इंदापूर तालुक्यातील जिरायती भागातून जावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:10 AM2021-07-28T04:10:05+5:302021-07-28T04:10:05+5:30

इंदापूर : मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनबाबत सध्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रस्तावित जागेबाबत ड्रोन सर्व्हेदेखील झाला आहे. ...

Bullet train should pass through Jiraiti area of Indapur taluka | बुलेट ट्रेन इंदापूर तालुक्यातील जिरायती भागातून जावी

बुलेट ट्रेन इंदापूर तालुक्यातील जिरायती भागातून जावी

Next

इंदापूर : मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनबाबत सध्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रस्तावित जागेबाबत ड्रोन सर्व्हेदेखील झाला आहे. ही ट्रेन इंदापूर तालुक्यातील बागायती पट्ट्यातून जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेती उद्ध्वस्त होणार असल्याने शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. त्यामुळे सदरची ट्रेन पर्यायी मार्गाने जावी अशी आपण केंद्राकडे मागणी करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

सध्या इंदापूर तालुक्यातील सणसर, भवानीनगर परिसरातून बुलेट ट्रेनच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. यामध्ये तालुक्यातील बागायती जमीन हस्तांतर होणार असून शेकडो नागरिकांची राहती घरे मोडली जाणार आहेत. तसेच तालुक्यातील निरा डावा कालव्याला याचा धोका होणार आहे. साहजिकच या तालुक्यातील शेती अडचणीत येणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांकडून या प्रकल्पास विरोध होत आहे. त्यामुळे आपण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सदरचा प्रकल्प अन्य पर्यायी मार्गाने पूर्ण करण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले.

केंद्राकडून सदर बुलेट ट्रेनबाबत वेगाने हालचाली होऊन, सर्व्हे करणारी टीम इंदापूर तालुक्यातील विविध भागांत येऊन गेली आहे. त्या टीमला शेतकऱ्यांनी थेट जाग्यावर चर्चा केली होती. त्याच वेळी शेकडो शेतकऱ्यांनी तत्काळ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करण्यास धाव घेतली होती. भरणे यांच्या निवासस्थानी जाऊन शेतकऱ्यांनी विविध अडचणी सांगून चर्चा केली होती.

प्रकल्पास आमचा विरोध नाही.

मुंबई हैद्राबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प होणे देशाच्या हिताचे आहे. या प्रकल्पास आमचा विरोध नाही, परंतु सदरचा प्रकल्प अन्य मार्गांहून करणे शक्य असल्याने पर्यायी मार्गाने प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी आमची मागणी असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Web Title: Bullet train should pass through Jiraiti area of Indapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.