बुलेट ट्रेनमुळे ऊसशेतीसह पाणी वाटपावर होणार परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:08 AM2021-07-23T04:08:16+5:302021-07-23T04:08:16+5:30

शेतकरी कृती समितीने व्यक्त केली भीती : भूलथापांना बळी न पडण्याचे केले आवाहन लासुर्णे : भवानीनगर (ता. इंदापूर) ...

The bullet train will affect the distribution of water, including sugarcane | बुलेट ट्रेनमुळे ऊसशेतीसह पाणी वाटपावर होणार परिणाम

बुलेट ट्रेनमुळे ऊसशेतीसह पाणी वाटपावर होणार परिणाम

Next

शेतकरी कृती समितीने व्यक्त केली भीती : भूलथापांना बळी न पडण्याचे केले आवाहन

लासुर्णे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र बुलेट ट्रेनमुळे विभागले जाणार आहे. त्यामुळे ऊस शेतीसह शंभर वर्षांपूर्वी मिळालेल्या पाणी वाटपावरसुद्धा परिणाम होणार असल्याची भीती शेतकरी कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी या प्रकल्पाचा गांभीर्याने विचार करणे गरज व्यक्त करीत प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी कुठल्याही भूलथापाला व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

इंदापूर तालुक्यातील तमाम शेतकरी बंधू व ग्रामस्थांनो जागे व्हावे. सध्या इंदापूर तालुक्यामध्ये मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या सर्व्हेचे काम सुरू आहे व यासंबंधी तहसीलदार, प्रांतधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांचा कुठलाही आदेश नाही. ट्रेनमुळे पालखी महामार्गाप्रमाणे केंद्रशासनकडून करोडो रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे, असे भासवले जात आहे, हे पूर्णत: चुकीचे आहे. इंदापूर तालुक्यातील बागायती क्षेत्राची शासकीय किंमत ही प्रतिएकर आठ ते दहा लाख रुपये इतकीच आहे. त्यामुळे आज जमिनीचे बाजारभाव आहेत त्यापेक्षा अधिक पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नाही.

सदर प्रस्तावित रेल्वेमुळे या भागातील कॅनॉल, वागायती क्षेत्र व शेतक-यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. प्रत्येक क्षेत्राचे, गावाचे, रस्त्यांचे दोन भाग पडणार आहेत. सदर रेल्वे रुळाचे दोन्ही कडेला भिंतीचे कुंपण असणार आहे. यामुळे जवळच्या शेतात जाण्यासाठी पाच ते दहा किमी अंतरावरून जावे लागेल व पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन व घरे जमीनदोस्त होणार आहेत. देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जमीन मात्र तेवढीच राहिली आहे, त्यामुळे भविष्यात पैसे असले तरी जमीन परत घेणे शक्य होणार नाही याची तमाम जनतेने नोंद घ्यावी. सदर सर्वे यापूर्वी पुणे-सोलापुर महामार्गालगत झाला होता मग बागायती क्षेत्रातून परत सर्वे करायचा अट्टहास कशासाठी? असा सवाल जाचक यांनी व्यक्त केला आहे.

सदर नियोजित सर्वेबाबत सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींना मी स्वत: कल्पना दिलेली आहे.सदर प्रकल्प त्वरित थांबविणे विषयी विनंती केलेली आहे. सदर प्रकल्पास पक्षीय गट-तट विसरून सर्वांनी एकत्र येऊन विरोध करणे पुढील पिढीच्या हिताचे आहे. तालुक्यातील तमाम जनतेने याबाबत जागृृत होण्याची गरजदेखील जाचक यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The bullet train will affect the distribution of water, including sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.