Pune: गुंडांची दादागिरी पोलिसांनी ‘मोक्का’ने जिरवली; ताडीवाला रोड येथे गुंड टोळीवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 12:15 PM2023-08-07T12:15:30+5:302023-08-07T12:16:11+5:30
आतापर्यंत शहरातील ४४ गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाई...
पुणे :पुणे स्टेशनजवळील ताडीवाला रोड भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ४४ गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाई केली आहे.
संघर्ष ऊर्फ भाव्या नितीन आडसूळ (वय २१), साहील राजू वाघमारे ऊर्फ खरखर सोन्या (वय २२), अतुल श्रीपाद म्हस्कर ऊर्फ सोनू परमार (वय २२, तिघे रा. ताडीवाला रोड) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. गेल्या महिन्यात आडसूळ आणि साथीदारांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली हाेती. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी आडसूळ, त्याचे साथीदार वाघमारे, म्हस्कर यांना अटक करण्यात आली हाेती. आडसूळ, वाघमारे, म्हस्कर यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत.
त्यांनी ताडीवाला रोड भागात टोळी तयार करून दहशत माजविली होती. या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील यांनी तयार केला होता. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत तो अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे पाठविला होता. पाटील यांनी त्याची पडताळणी करून आडसूळ टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.