राजकीय कार्यक्रम, वाढदिवसाला बैलगाडा शर्यतींना परवानगी नाही; नवी नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 02:35 PM2023-05-25T14:35:44+5:302023-05-25T14:36:26+5:30

वाढदिवस, राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे प्रमाण वाढले असून त्यासाठी भरमसाठ बक्षिसेही ठेवली जात होती

Bullock cart races are not allowed on political events, birthdays; New regulations announced | राजकीय कार्यक्रम, वाढदिवसाला बैलगाडा शर्यतींना परवानगी नाही; नवी नियमावली जाहीर

राजकीय कार्यक्रम, वाढदिवसाला बैलगाडा शर्यतींना परवानगी नाही; नवी नियमावली जाहीर

googlenewsNext

मंचर : राज्यातील बैलगाडा शर्यती संदर्भात राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने नव्याने मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या आहेत. त्यानुसार यापुढे यात्रा, जत्रा, उत्सव अशाच बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळणार असून राजकीय कार्यक्रम, वाढदिवस या प्रसंगी आयोजित बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे परंपरागत बैलगाडा शर्यत पार पडणार आहेत. मात्र मागील वर्षभरात परंपरागत यात्रा भरत असताना वाढदिवस तसेच राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित बैलगाडा शर्यतीचे प्रमाण वाढले होते. त्यासाठी भरमसाठ बक्षिसे ठेवली जात होती. बैलगाडा शर्यतींचा अक्षरशः अतिरेक झाला होता. यावर काही प्रमाणात बंधने असावी अशी बैलगाडा मालकांची इच्छा होती. परंपरेने होणाऱ्या यात्रा कमी मात्र वाढदिवसानिमित्त होणाऱ्या यात्रा जास्त झाल्या होत्या. याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. 24 मेला जीआर काढून राज्य शासनाने राज्यातील बैलगाडा शर्यती संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरेनुसार साजऱ्या करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशाच प्रसंगी बैलगाडा शर्यतीच्या आयोजनात परवानगी देण्यात येणार आहे. 

राजकीय कार्यक्रम, वाढदिवस आदी प्रसंगी बैलगाडा शर्यतीच्या आयोजनात परवानगी कोणत्याही परिस्थितीमध्ये देऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच राज्यात केवळ बैलगाडा शर्यत, शंकरपट, छकडी अशा प्रकारच्या 1000 मीटर पेक्षा कमी अंतर असलेल्या बैलगाडा शर्यतीस परवानगी आहे. राज्यातील अनधिकृतपणे आयोजित होणाऱ्या आरत पारत, बैल घोडा, लाकूड ओंडका ओढणे, चिखलगट्टा, समुद्रकिनाऱ्यावरील शर्यती, टक्कर तसेच एक हजार मीटर पेक्षा जास्त अंतराच्या इतर तत्सम बैलगाडी शर्यतीला प्रतिबंध असणार आहे. बैलगाडा शर्यत आयोजित करताना नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यात विनापरवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन झाल्यास गुन्हा दाखल होणार आहे. शर्यतीच्या पंधरा दिवस अगोदर परवानगीसाठी अर्ज करावा लागेल. नियम व अटीचे पालन करूनच शर्यतीचे आयोजन करावे लागेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बैलगाडा  शर्यत कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे

बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यश येऊन शर्यती सुरू झाल्या. मात्र पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या बैलगाडा शर्यतीपेक्षा वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या गेल्या.आता शासनाने त्यावर बंधने आणली आहेत. त्याचे आम्ही स्वागत करतो. सर्वांनी नियमाचे पालन करून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करावे ही शर्यत कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे.- संदीप बोदगे, अखिल भारतीय बैलगाडा संघटना.

Web Title: Bullock cart races are not allowed on political events, birthdays; New regulations announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.