बंदी असताना धावले बैलगाडे .... बैलगाडा मालक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:20 PM2018-05-18T17:20:29+5:302018-05-18T17:55:14+5:30
बैलगाडा मालकांनी राज्य सरकारलाच येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात बैलगाडा शर्यत सुरू झाली नाहीतर आम्ही बंदी झुगारून खुलेआमपणे सर्व गाडा मालक एकत्र येऊन बैलगाडे घाटामध्ये पळवू असा इशारा दिला होता.
दावडी : बैलगाडा शर्यतीवरील जर न्यायालयीन बंदी उठवली नाही तर १५ मे नंतर न्यायालयीन बंदी झुगारुन बैलगाडा घाटात पळवू असा इशारा खेड तालुक्यातील बैलगाडा मालकांनी दिला होता. ही बंदी झुगारुन बैलगाडा मालकांनी निमगाव खंडोबा ( ता खेड ) येथे बैलगाडे पळविले. दरम्यान, या घटनेची पोलिसांना कुणकुण लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बैलगाडा शर्यती बंद केल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बैलगाडा शर्यतीच्या न्यायालयीन बंदीला जवळपास चार वर्ष पूर्ण झाली आहे. बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी बैलगाडा मालकांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र, बैलगाडा मालकांना शर्यती सुरु होण्याची परवानगी मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी राजगुरूनगरमध्ये बैलांची मिरवणुक काढून न्यायालयाचा निषेध केला होता. खेड, आंबेगाव, मावळ, हवेली तालुक्यात बैलगाडा मालकांनी काळा दिवस पाळत शहरातून काळे झेंडे घेऊन बैलगाडयासह निषेध रॅली काढली होती. यावेळी संतप्त बैलगाडा मालकांनी राज्य सरकारलाच येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात बैलगाडा शर्यत सुरू झाली नाहीतर आम्ही बंदी झुगारून खुलेआमपणे सर्व गाडा मालक एकत्र येऊन बैलगाडे घाटामध्ये पळवू असा इशारा दिला होता. त्याप्रमाणे शुक्रवारी (दि. १८ ) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यत बैलगाडा मालकांनी घाटात पळविल्या. या कालावधीत ५० ते ६० बैलगाडे घाटात धावले. बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शौकिनांनी गर्दी केली होती. बैलगाडा धावण्याच्या वेळेची ध्वनीवर्धकावर माहिती सांगण्यात येत होती. या गोष्टीची कल्पना खेड पोलिसांना होती. दोन पोलीस सकाळीच घाटात होते. मात्र, सकाळी ७ ते ११ वाजेपर्यतच बैलगाडा पळविले जाणार होते. मात्र, ११ वाजल्यानंतर पोलिसांनी बैलगाडा शर्यती बंद केली व घाटातील गर्दी हटवली. याबाबत कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही.