पीएमपीकडून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना ‘बंपर’ भेट..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 12:30 PM2019-03-07T12:30:56+5:302019-03-07T12:34:37+5:30
प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बस मधील महिलांना एक दिवस मोफत बस प्रवास करता येणार आहे..
प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला मिळणार मोफत प्रवास
पुणे: जागतिक महिला दिनाचे निमित्त साझून पुणे महानगरपालिका व पीएमीपी प्रशासन यांच्यातर्फे शहरातील महिलांना बंपर भेट देण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बस मधील महिलांना एक दिवस मोफत बस प्रवास करता येणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक व पीएमपीचे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे उपस्थित होते.
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, दरम्यान महिला दिना निमित्त येत्या ८ मार्च पासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण दिवसभर महिलांच्या स्पेशल तेजस्विनी बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास करता येणार असल्याची घोषणा देखील टिळक यांनी केली. याशिवाय यानंतरच्या प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला या तेजस्विनी बसेस मधून महिलांना एक दिवस मोफत प्रवास करणे शक्य होणार आहे. सध्या पीएमपीकडे ३९ तेजस्विनी बस आहेत.
महिलांना सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने विविध योजनांद्वारे पावले उचलली जातात. पण, यावेळी माजी सैनिकांच्या पत्नी व तसेच विधवा पत्नी यांच्यामार्फत ४० बसेस पीएमपीने भाडेतत्वावर खरेदी करण्याचा क्रांतीकारी निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना सक्षमीकरणाचा प्रयत्न केला जाणार आहे. माजी सैनिकांच्या पत्नी व विधवांच्या बचत गटाकडून घेण्यात येणा-या बसेस या निविदा प्रक्रियेतील सर्व अटी, शर्ती लागू करूनच घेण्यात येणार आहेत. पीएमपीएमएलच्या स्पेसिफिकेशन प्रमाणेच या बसेचा पुरवठा करण्यात येईल. लवकरच यामध्ये आणखी २७ तेजस्विनी बसची भर पडणार आहे. अशा प्रकारे या ६६ तेजस्विनी बसमधून महिलांना दर महिन्याच्या ८ तारखेला मोफत प्रवास करता येईल, असेही टिळक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.