बंडगार्डन पूल आता ‘आर्ट प्लाझा’
By Admin | Published: January 21, 2016 12:55 AM2016-01-21T00:55:52+5:302016-01-21T00:55:52+5:30
येरवड्यातील ब्रिटिशकालीन बंडगार्डन पुलाचे पालिकेच्या हेरिटेज विभागाने सुरेख अशा ‘आर्ट प्लाझा’त रूपांतर केले आहे. जुन्या पुलाचा असा वापर करणारी पुणे
पुणे : येरवड्यातील ब्रिटिशकालीन बंडगार्डन पुलाचे पालिकेच्या हेरिटेज विभागाने सुरेख अशा ‘आर्ट प्लाझा’त रूपांतर केले आहे. जुन्या पुलाचा असा वापर करणारी पुणे महापालिका ही राज्यातील पहिलीच पालिका आहे. काही आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर पुलावर कोणालाही आपल्या कलेचे विनामूल्य सादरीकरण करता येईल.
पुलाचे ९० टक्के काम पुर्ण झाले असून महिनाभरात तो सर्वांसाठी खुला होईल. वाहतूक प्रचंड वाढल्यामुळे ब्रिटीश काळातील हा पुल काही वर्षांपुर्वीच वाहतुकीस बंद करण्यात आला. तेव्हापासून त्याकडे दुर्लक्ष झाले होते. वापरच नसल्याने त्याची देखभाल दुरूस्तीही बंद होती. त्यामुळे पक्क्या दगडी बांधकामाचा हा पूल हळुहळु पडिक होऊ लागला. पालिकेच्या हेरीटेज विभागाचे प्रमुख अभियंता शाम ढवळे यांच्या ही गोष्ट लक्षात आली व त्यांनी या पुलाचा कायापालट करण्याचे ठरवले. आयुक्त कुणाल कुमार, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, स्थानिक नगरसेवक राजेंद्र वागसकर यांची संमती मिळवली व सहकारी अभियंता सुनिल मोहिते यांच्या साह्याने कामाला सुरूवात केली.
साधारण ८०० फूट लांबी व ६०० फूट रुंदी असलेल्या या पुलाची जुनी आकर्षक बांधकाम शैली कायम ठेवून त्यांनी वर्षभरातच त्याचा कायापालट केला आहे. पुलावर आता छान गुलाबी रंगाच्या फरशा बसविल्या आहेत.
बसण्यासाठी ग्रॅनाईटचे सुरेख बाक आहेत. एक लहानसे व्यासपीठ आहे. कोणीही त्यावरून आपल्या कलेचे सादरीकरण करू शकेल व कोणीही ते पाहू शकेल. त्याशिवाय छायाचित्र, पोस्टर्स, चित्र यांचे कोणाला प्रदर्शन आयोजित करायचे असेल तर त्यासाठी हलवता येणारी पॅनेल्स आहेत.
मागणी केली की ती उपलब्ध होतील. कठड्याला टेकून कोणाला सूर्योदय, सूर्यास्त पहायचा असेल तर त्यालाही पुर्ण मुभा आहे. शिवाय या सगळ्यासाठी प्रवेशमुल्य नाही. सादरीकरण व पहायलाही नाही. अशा सर्वांचे हात लागल्यामुळेच पुलाला सध्याचे रूप मिळाले असे ढवळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हे सगळे झाले फक्त १ कोटी रूपयांमध्ये, खरे तर त्याहीपेक्षा कमी पैशात. कारण कामाचे स्वरूप पाहून खुद्ध ठेकेदारच त्याच्या प्रेमात पडला. असा हेरिटेज ब्रीज पालिका सुशोभीत करीत आहे याची माहिती झाल्यावर भारती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्वत: त्याचे आरेखन करून दिले. खासदार वंदना चव्हाण यांनी परदेशात त्यांनी पाहिलेल्या अशा प्रकारच्या काही पुलांची माहिती दिली व त्याप्रमाणे काम करण्यास सुचवले. आयुक्तांनीही अनेक गोष्टींना त्वरीत परवानगी दिली.