बुंद से गयी वो हौद से नहीं आती...; पुण्यातील ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह प्रकार, राजकीय पक्षांच्या आश्रयानेच गैरधंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:36 AM2024-05-21T09:36:43+5:302024-05-21T09:37:07+5:30
रात्री अडीच वाजता घडलेल्या या प्रकारात पळून जाणाऱ्या बिल्डरपुत्राला चोप देत प्रत्यक्षदर्शिनी पोलिस ठाण्यात आणले....
पुणे : बिल्डरपुत्राने दारू पिऊन केलेल्या अपघातात दोघांचा बळी गेला, त्यानंतर आता सगळे राजकीय पक्ष जागे होऊन पोलिस आयुक्तांना निवेदन वगैरे देत आहेत. मात्र, याच प्रकरणात गाडी चालवणाऱ्या बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी एक आमदारच पुढे आला होता, याचा सर्वांना सोयीस्कर विसर पडतो आहे. राजकारण्यांच्या आश्रयानेच सगळे गैरधंदे सुरू असतात. या जनभावनेला पुष्टी देणारे वर्तनच लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या आमदाराच्या हातून घडले असल्याचे आता शहरात सर्वत्र बोलले जात आहे.
रात्री अडीच वाजता घडलेल्या या प्रकारात पळून जाणाऱ्या बिल्डरपुत्राला चोप देत प्रत्यक्षदर्शिनी पोलिस ठाण्यात आणले. तिथे त्याला वाचवायला रात्री ३:०० वाजता सर्वप्रथम पोहचले ते वडगाव शेरीचे लोकनियुक्त आमदार सुनील टिंगरे. ते आमदार झाले एकत्रित राष्ट्रवादीत, नंतर अलीकडे फुटले व अजित पवार यांच्या गटात गेले. त्याआधीचा त्यांचा राजकीय प्रवास मनसे, शिवसेना व नंतर सन २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असा आहे. शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना वडगाव शेरी विधानसभेची उमेदवारी मिळाली व ते निवडूनही आले. बिल्डर असलेल्या विशाल अगरवाल यांच्या मुलाला पोलिसी कारवाईतून वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी रात्री ३:०० वाजता पोलिस ठाण्यात धाव घेतल्यावरून त्यांच्यावर आता टीका होत आहे.
बड्या बापाच्या बिघडलेल्या पोराकडून झालेल्या या भीषण घटनेवर पडदा पाडण्याचा आमदार टिंगरे यांचा प्रयत्न चर्चेचा विषय झाल्यानंतर राजकीय पक्षांनी आता मोहरा बदलला आहे. या घटनेवरून राजकीय श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याची सुरुवात केली भाजपने. त्यात राजकीय गणिते आहेत. टिंगरे ज्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत ते आता महायुतीमध्ये आहेत. मात्र, स्थानिक स्तरावर या युतीविषयी अप्रिती आहे. त्यामुळेच लगेच भाजपच्या पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत पोलिस आयुक्तांना या घटनेबाबतचे निवेदन देले. त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अक्षय जैन यांनीही पोलिस आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिले व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
आता जे या घटनेच्या विरोधात निवेदन वगैरे देत आहेत, त्यांच्यातीलच काहींच्या पाठिंब्याने शहरात गैरधंदे फोफावले असल्याची उघड चर्चा शहरात आहे. अशा घटनांमध्ये पोलिस काही कारवाई करायला गेले तर लगेचच बड्या राजकीय व्यक्ती पोलिसांवर दबाव टाकतात. मिटवामिटवी करतात. त्यासाठी राजकीय कनेक्शन वापरले जाते. पोलिसही मग त्यानंतर काहीही न करता निवांत राहतात. हे सगळे राजकीय आश्रयानेच होत असल्याचे कल्याणीनगर रहिवाशांचे म्हणणे आहे. अपघातातील मृताच्या नातेवाइकांचे साधे सांत्वन करण्यासाठी कोणीही राजकारणी अजून तरी गेलेला नाही, हे यात विशेष.
अपघाताची माहिती मला पहाटे ३:०० वाजता काही कार्यकर्ते व परिचित विशाल अगरवाल यांनी दिली. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यानंतर लगेचच घटनास्थळी व तिथून येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. वरिष्ठ पोलिस अधिकारी आल्यानंतर त्यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला. कायद्यानुसार योग्य ती कारवाई करा, असे सांगून मी तिथून निघून आलो. मी स्वत: येथील पब व बार त्याविरोधात, नाइट लाइफच्या विरोधात वारंवार निवेदने दिली आहेत, असे असताना या घटनेवरून माझी विनाकारण राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सुनील टिंगरे- आमदार