सभागृहनेतेपदी बंडू केमसे
By admin | Published: April 14, 2015 01:38 AM2015-04-14T01:38:43+5:302015-04-14T01:38:43+5:30
महापालिकेच्या सभागृहनेतेपदी शंकर ऊर्फ बंडू केमसे यांची सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवड करण्यात आली आहे
पुणे : महापालिकेच्या सभागृहनेतेपदी शंकर ऊर्फ बंडू केमसे यांची सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवड करण्यात आली आहे. माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनी तब्बल चार वर्षे हे पद सांभाळल्यानंतर शनिवारी या पदाचा राजीनामा महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर आज झालेल्या मुख्य सभेत या पदावर असलेल्या जगताप यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी केमसे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली, तसेच केमसे यांना निवडीचे पत्रही देण्यात आले. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने केमसे यांचा सत्कार करण्यात आला.
केमसे यांनी २००१ ते २००७ या कालावधीत शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे पक्षाचे काम पाहिले. त्यानंतर २००७ च्या महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून पालिकेची निवडणूक लढविली तर, त्यानंतर त्यांनी २०१२ च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २९ अ मधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी खडकवासला मतदारसंघातूनही ते इच्छुक होते. कोथरूड परिसर तसेच भुसारी कॉलनीतील नागरिकांच्या पाणी समस्येसाठी केमसे यांनी वेळोवेळी मोठी आंदोलने केल्याने पाणीवालेबाबा म्हणूनही केमसे महापालिकेत ओळखले जातात.
सर्वांना सोबत घेऊन काम करणार : केमसे
सभागृहनेतेपदाची धुरा सांभाळताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे केमसे यांनी निवडीनंतर मुख्य सभेत बोलताना सांगितले. शहराच्या हिताच्या विरोधात कोणताही निर्णय न घेता, त्यासाठी विरोधी पक्षांची भूमिका योग्य असल्यास वेळ प्रसंगी त्यासाठी त्यांच्या बाजूने उभे राहण्यासही आपली तयारी असल्याचेही ते या वेळी बोलताना म्हणाले.
गेल्या चार वर्षांत शहराच्या भविष्यासाठी चांगले निर्णय घेण्याची संधी पक्षामुळे आपल्याला मिळाली. त्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक, तसेच प्रशासनाची मोठी साथ मिळाली. त्यामुळे या चार वर्षांतील कामगिरीबाबत आपण समाधानी आहोत.
- सुभाष जगताप
(मावळते सभागृहनेते)