प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवला एक बंगला न्यारा !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 11:30 PM2020-01-04T23:30:00+5:302020-01-04T23:30:03+5:30
तब्बल ६० हजारहून अधिक रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर
श्रीकिशन काळे
पुणे : सध्या बाटली बंद पाण्याच्या बाटल्यांचा कचरा अनेक ठिकाणी दिसून येतो. परंतु, याच कचºयापासून टुमदार घर बनविण्याची किमया एका पुणेकराने केली आहे. तब्बल ६० हजारहून अधिक रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून दोन मजली घर साकारले आहे. घेरा सिंहगड या परिसरात हे घर असून, बाटल्यांचा अतिशय चांगल्या पध्दतीने वापर करून एक बंगला बना न्याराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले आहे. वास्तूविशारद राजेंद्र इनामदार यांनी हे घर उभा केले आहे.
प्लास्टिकचा कचरा जिरवणे कठिण काम बनले आहे. त्यामुळे त्यावर इतर उपाय शोधणे किंवा त्याचा पुनर्वापर करणे योग्य ठरणारे आहे. या उपक्रमातंर्गत इनामदार यांनी हजारो बाटल्यांचा पुनर्वापर करून ते इतरत्र कुठेही कचरा म्हणून पडण्यापासून वाचविल्या आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे घर उभे करण्यात येत आहे. कारण बाटल्या संकलित करणे, त्यामध्ये क्रश, वाळू, सिमेंट भरणे याला खूप वेळ लागतो. परंतु, बाटल्यांमध्ये सिमेंट, वाळू भरल्यावर ते वीटेसारखेच टणक बनते.
या उपक्रमाविषयी इनामदार म्हणाले, मला श्वानांसाठी घर बांधायचे होते. एका दिवशी रात्री डोक्यात रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घर बांधायची कल्पना सुचली. त्यानंतर मी इंटरनेटवर असा प्रयोग कोणी केला आहे का ? ते पाहिले. तेव्हा जगभरात असे प्रयोग झाले आहेत. पण आपल्या इथे मात्र कोणी केलेले दिसले नाही. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरवातीला किल्ले सिंहगड परिसरातील प्लास्टिक बाटल्या संकलित केल्या. त्यानंतर हॉटेलमध्येही रिकाम्या बाटल्या असतात, त्या जमा केल्या. त्यामध्ये कामगार लावून सिमेंट, वाळू, क्रश भरले. तीन वर्षांनंतर आता हे घर तयार झाले असून, एका महिन्यात संपूर्ण काम होईल.’’
पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरणाºया प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घर उभारून काही प्रमाणात कचºयाचा पुनर्वापर केला आहे. परंतु, प्रत्येकाने जर अशा प्रकारे वस्तूंचा पुनर्वापर केला तर कचºयामुळे वातावरण प्रदूषित होणार नाही, असे आवाहन इनामदार यांनी केले आहे. एक बाटलीचा खर्च साडेतीन रूपये
एका वीटेची किंमत सुमारे सात रूपयांना पडते. पण एक बाटली भरायला साडेतीन रूपये खर्च येतो. त्यामुळे खर्च कमी आहे. एक वीटेला जेवढी जागा लागते, त्याला दीड बाटली लागते. त्यामुळे विटेचा आणि या बाटलीचा खर्च जवळपास एकच होतो. पण बाटल्यांचा कचरा वातावरणात राहण्यापेक्षा एकाच ठिकाणी त्याचा उपयोग होतो, म्हणून हा उपक्रम राबविला.
तळजाईवर बाटल्यांपासून बसण्यासाठी बाकडे
दोन-तीन वर्षांपूर्वी प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्याचा छोटासा उपक्रम टेल्स ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट यांनी काही वर्षांपूर्वी तळजाई टेकडीवर केला होता. त्या ठिकाणी बसण्यासाठी सुमारे पन्नास प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बाकडे तयार केली होती. ती बाकडे आजही चांगल्या अवस्थेत आहेत.