हिंजवडीमध्ये बगाडाची मिरवणूक

By admin | Published: April 12, 2017 04:12 AM2017-04-12T04:12:59+5:302017-04-12T04:12:59+5:30

हिंजवडी गावचे ग्रामदैवत म्हातोबा महाराजाच्या उत्सवातील सर्वांचे आकर्षण असलेल्या बगाड मिरवणुकीला आयटी अभियंत्यासह पंचक्रोशीतील हजारो आबालवृद्ध व महिला

A bungalow procession in Hinjewadi | हिंजवडीमध्ये बगाडाची मिरवणूक

हिंजवडीमध्ये बगाडाची मिरवणूक

Next

वाकड : हिंजवडी गावचे ग्रामदैवत म्हातोबा महाराजाच्या उत्सवातील सर्वांचे आकर्षण असलेल्या बगाड मिरवणुकीला आयटी अभियंत्यासह पंचक्रोशीतील हजारो आबालवृद्ध व महिला भाविकांची एकच गर्दी झाली होती. भंडारा व खोबरे उधळीत हलगीच्या नादात भाविकांनी जल्लोष करून म्हातोबारायाला सुखी ठेवण्याचे साकडे घातले. हिंजवडी गावठाणातील होळी मैदानातून सुरु झालेल्या व दर्शन देत निघालेल्या बगाड मिरवणुकीचा शेवट सायंकाळी उशिरा वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात झाला.
या वर्षी जांभूळकर घराण्याच्या वाड्यातील राजू शांताराम जांभूळकर या तरुणाला गळकरी होण्याचा मान मिळाला, तर राजू याच्यासह संदीप साखरे व संभाजी साखरे यांना मानाचे खांदेकरी करण्यात आले. साडेचारच्या सुमारास गळकऱ्याला खांदेकरी संदीप साखरे व संभाजी साखरे यांनी होळी पायथ्याला आणले. हिंजवडीकडून साखरे पाटील घराण्यातील संदीप पंढरीनाथ साखरे, तसेच वाकडकडून सुतार समाजातील पांडुरंग सुतार यांनी गावठाणातील होळी पायथ्याला गळकऱ्याला गळ टोचल्याची माहिती उपसरपंच राहुल जांभूळकर यांनी दिली.
मंदिरात मानाची कावड गेल्यानंतर गळकऱ्याच्या गळ्यात काळुराम पारखी यांनी माळ टाकली. त्यानंतर जमलेल्या गावातील महिलांनी त्याला स्नान घातले. लाल धोतर व लाल पगडी हा देवाचा पोशाख नेसविला. म्हातोबाचे दर्शन घेऊन खांदेकऱ्यांच्या मदतीने त्याला दर्शनासाठी मारुती मंदिरात नेण्यात आले. त्यानंतर गळ टोचलेल्या राजूला बगाड रिंगण मैदानात नेऊन बगाडावर बसवून भाविकांच्या साक्षीने गोल रिंगण मारण्यात आले. ‘म्हातोबाच्या नावाने चांगभलं’च्या जयघोषात आयटीनगरी दुमदुमली. (वार्ताहर)

- आडगाव बारपेच्या जंगलातून आणलेल्या शेलापासून बगाडाच्या रथाची उभारणी दोन दिवसांपासून करण्यात येत होती. सकाळी मारुती मंदिरात अभिषेक करण्यात आला. दिवसभर मिरवणुकीची तयारी पूर्ण झाल्यानंतर प्रचंड जनसागराच्या गराड्यात बगाडाचा रथ गावठाणातील बगाड रिंगण मैदानात आणण्यात आला. या वेळी गावचे किसन साखरे पाटील यांनी गळकऱ्यांची घोषणा केल्यानंतर हलगीचा नाद, गावकऱ्यांच्या हातातील काठी उंचावून होणारा काठी नाद, तसेच पैस...पैस... म्हातोबाच्या नावानं चांगभलं या गजरात त्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात नेण्यात आले.

Web Title: A bungalow procession in Hinjewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.