बांगरवाडीतील गुप्त विठोबाला गर्दी
By admin | Published: July 16, 2016 12:55 AM2016-07-16T00:55:11+5:302016-07-16T00:55:11+5:30
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या बांगरवाडी येथील गुप्त विठोबा मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी होती.
बेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या बांगरवाडी येथील गुप्त विठोबा मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी होती.
सकाळी सहा वाजता मुंबई येथील ए.टी.एस.चे पोलीस निरीक्षक किसनराव गायकवाड यांच्या हस्ते देवास अभिषेक केला. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून या ठिकाणी बेल्हा, आणे, साकोरी, गुळूंचवाडी, कळस, तांबेवाडी आदी ठिकाणांवरून आलेल्या दिंड्यांचे स्वागत श्री विठ्ठल-रुक्मिणी सेवा मंडळाचे अध्यक्ष नकाजीबुवा बांगर यांनी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आशाताई बुचके, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उपसभापती महादू भोर, जुन्नर पंचायत समितीच्या सभापती संगीता वाघ, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे, जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ आदींनी भेट दिली. या ठिकाणी ग्रामस्थांनी येणाऱ्या भाविकांची सोय उत्तमरीत्या केली होती. तसेच या ठिकाणी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने बसची सोय करण्यात आली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संध्याकाळपर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.