भारनियमनाने कोलमडला शेतकरी
By admin | Published: May 6, 2017 02:05 AM2017-05-06T02:05:20+5:302017-05-06T02:05:20+5:30
शेतीमालाचे घसरलेले दर, उन्हाचा चटका, दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असतानाच वीज महावितरण कंपनीने भारनियमन
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : शेतीमालाचे घसरलेले दर, उन्हाचा चटका, दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असतानाच वीज महावितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भरच पडली आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना भारनियमनाचा ‘शॉक’ बसला आहे. याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक तुषार झेंडे यांनी महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन सुरू केले आहे.
यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक आहे. पाणीटंचाईचे संकट आहेच. त्याचबरोबर शेतीमालाचे दरही कोसळल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्याआत्महत्येचे लोण बारामती तालुक्यातदेखील आले आहे. आतापर्यंत तीन शेतकऱ्यांनी नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून राजकीय रणकंदन सुरू असतानाचा विजेच्या तुटवड्यामुळे तातडीने भारनियमन सुरू केले आहे. सध्या सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत ग्रामीण भागात भारनियमन सुरू करण्यात आल्याचे बारामती परिमंडलाच्या सूत्रांनी सांगितले. या भारनियमनामुळे आंदोलने करून सोडण्यात आलेल्या कालव्याच्या आवर्तनाचे पाणीदेखील शेतकऱ्यांना घेता येत नाही, अशी स्थिती आहे. भारनियमनाच्याविरोधात शेतकरी संतापले आहेत.
या भारनियमनाच्याविरोधात ग्राहक पंचायतीचे संघटन तुषार झेंडे यांनी भारनियमनाची पूर्वसूचना देण्यात आलेली नाही.
विद्युत नियामक आयोग व विद्युत कायदा २००३ च्यानुसार ही कृती आक्षेपार्ह आहे. त्यामुळे भारनियमन न थांबवल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१महावितरणच्या बारामती मंडलात बारामती ग्रामीण, वालचंदनगर, इंदापूर या उपविभागातील गावांमध्ये १० ते १२ तासांचे अतिरिक्त वीज भारनियमन सुरू केले आहे. सिंगल फेज, थ्री फेज अशा सर्व प्रकारचा विद्युत पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
२पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मात्र या अघोषित भारनियमनामुळे अतिशय नाराजीची भावना असून हे भारनियमन तातडीने बंद करावे असे ठराव गावागावांत होत आहेत.