कोवळ्या जीवांवर मातृत्वाचे ओझे; १४ ते १७ वयोगटातील मुलींचे प्रमाण पुणे जिल्ह्यात सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 03:35 PM2017-12-09T15:35:31+5:302017-12-09T15:39:02+5:30

कोवळ्या जीवांवर मातृत्वाचे ओझे पडण्याचे प्रमाण पुणे जिल्ह्यात वाढत आहे. त्यातही कुमारी मातांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे आकडेवारी वरून समोर आले आहे.

The burden of the mother on the tiny creatures; The highest number of girls in the age group of 14 to 17 years is Pune | कोवळ्या जीवांवर मातृत्वाचे ओझे; १४ ते १७ वयोगटातील मुलींचे प्रमाण पुणे जिल्ह्यात सर्वाधिक

कोवळ्या जीवांवर मातृत्वाचे ओझे; १४ ते १७ वयोगटातील मुलींचे प्रमाण पुणे जिल्ह्यात सर्वाधिक

Next
ठळक मुद्देमहिन्याला सरासरी २५ ते ३० कुमारी माता जन्म देत आहेत बाळालाइयत्ता १० वी, ११ वी आणि १२ वीमध्ये शिकणाऱ्या मुली अधिक

सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : कोवळ्या जीवांवर मातृत्वाचे ओझे पडण्याचे प्रमाण पुणे जिल्ह्यात वाढत आहे. त्यातही कुमारी मातांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे आकडेवारी वरून समोर आले आहे. शहर आणि ग्रामीण भागात मिळून महिन्याला सरासरी २५ ते ३० कुमारी माता बाळाला जन्म देत आहेत. यामध्ये १४ ते १७ वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वांधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
पुण्यात चार दिवसांपूर्वी एका महाविद्यालयात शिकणाऱ्या कुमारी मातेला प्रसुती कळा सुरु झाल्या. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात प्रसुतीसाठी नेले असताना संबंधित डॉक्टारांनी प्रसुती करण्यास नकार दिला. अखेर एका खासगी रुग्णालयात या कुमारी मातेने बाळाला जन्म दिला. या  शहर आणि जिल्ह्यातील कुमारी मातांच्या संख्येबाबत धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. गरीब, मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय सर्वच स्तरातील कुमारी मातांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रसुती होणाऱ्या कुमारी माता साधारण सरासरी १५ ते २७ वयोगटांतील असतात. यामध्ये प्रामुख्याने सर्वांधिक कुमारी माता १५ ते १७ या वयोगटांतील म्हणजे इयत्ता १० वी, ११ वी आणि १२ वीमध्ये शिकणाऱ्या मुली अधिक असल्याचे प्रसुती तज्ज्ञ डॉक्टारांनी सांगितले. 
ससून रुग्णालायच्या स्त्री आरोग्य व प्रसूती शास्त्र विभागाचे डॉ. रमेश भोसले यांनी सांगितले, की विवाहपूर्व अल्पवयीन मुलीमधील गरोदरपण हा दिवसेंदिवस गंभीर विषय होत चालला आहे. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढत आहे. असुरक्षित शारीरिक संबंधामुळे मुलींवर या प्रसुती लादल्या जात आहेत. ससूनमध्ये येणाऱ्या कुमारी मातांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण सर्वांधिक आहे. यात प्रामुख्याने उन्हाळी सुट्टीनंतर हे प्रमाण वाढते. अल्पवयीन मुलीचे शारीरिक संबंध आल्यानंतर देखील आपल्या मासिक पाळीकडे दुर्लक्ष करतात. यात गर्भधारणेला २० आठवडे पूर्ण झाल्यानंतर कायदेशीरदृष्ट्या गर्भपात करता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा पाचव्या-सहाव्या महिन्यात पोट दिसू लागल्यानंतर कुमारी माता व पालक देखील जागे होता. परंतु तेव्हा वेळ गेलेली असते व त्या मुलींची प्रसुती करण्याशिवय दुसरा कोणताही पर्याय राहत नाही. यामुळे याबाबत महाविद्यालयीन मुलांमध्ये, पालकांमध्ये आणि सामाजामध्ये जनजागृती करण्याची गजर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांतील कुमारी मातांची माहिती (सरकारी रुग्णालयांतील)
महिना (२०१७)    कुमारी माता प्रसुती    अल्पवयीन
जून         २२        १०
जुलै        १४        ०४
आॅगस्ट        २३        १५
स्पटेंबर        १५        ०५
आॅक्टोबर    १२    ०९
नोव्हेंबर        ०६        ०५
एकूण        ९१        ४८    

कुमारी मातांची प्रसुती अनेक समस्यांना निमंत्रण
कुमारी मातांमध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलींच्या गर्भाशायाची पूर्ण वाढ झालेल नसते. यामुळे अशा वेळी मुलींना गर्भधारणा झाल्यानंतर अनेक वैद्यकीय तांत्रिक अडचणी निर्माण होतात. यात गर्भाशय फुटणे, प्रचंड रक्तस्त्राव होणे, गर्भाशय पिशवी ऐवजी दुसरीकडे गर्भ वाढणे, जन्माला येणाऱ्या बाळात शारीरिक व मानसिक व्यंग, कमी वजनाचे बाळ अशाअनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. यामध्ये काही वेळा गर्भाशय काढून टाकावा लागतो. अधिक गुंतागुत निर्माण झाल्यास कुमारी मातेचे जीव देखील जाऊ शकतो. कुमारी मुली गरोदर राहिल्यास आजही गर्भपात करण्यासाठी समाजामध्ये अनेक आघोरी  उपाय केले जातात. वैद्यकीय सल्ल्याशिवाय अनधिकृतपणे केलेले उपाय प्रसंगी कुमारी मातांचा प्राणघातक ठरू शकते.
- डॉ. रमेश भोसले, ससून प्रसुती विभाग प्रमुख


कुमारी माता एक सामाजिक प्रश्न
अविवाहित मुलींचा गरोदरपणा सामाजिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतींचा प्रश्न झाला आहे. कुमारी मातांची प्रथम कुटुंबाकडून अवेहलना होते. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व समाजाकडून स्वीकारले जात नाही. पाच-सहा महिन्यानंतर पोट दिसू लागल्यावर समाजात नाव खराब होईल, मुलींचे करीअर, आयुष्य बरबाद होईल, यामुळे बहुतेक सर्वच स्तरातील कुमारी मातांना प्रसुती होईपर्यंत शहरातील वेगवेगळ््या सामाजिक संस्थांमध्ये आश्रय दिला जातो. प्रसुतीनंतर ९८ ते ९९ टक्के माता प्रसूतीनंतर बाळ सोडून देण्याचाच निर्णय घेतात.

अल्पवयीन मुलींचा गरोदरपणा कायद्याने गुन्हा
आपल्याकडे कायद्यानुसार अविवाहित व १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी सहमतीने अथवा इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा ठरतो. यामध्ये अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यास भारतीय संविधान कलम ३७६ नुसार संबंधित मुलांवर गुन्हा दाखल केला जातो. सामाजिक दबाव आणि किचकट कायदेशीर प्रक्रिया यामुळे अनेक प्रकरणांमध्ये  गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत. परंतु चार महिन्यांपेक्षा अधिक दिवस होऊन गेल्यानंतर कायद्यानुसार त्या कुमारी मातेचे गर्भपात करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होतो. परंतु अशी प्रकरणे ठोस पुरावे नसल्याने न्यायालयात टिकत नाहीत.
- अ‍ॅड. सुप्रिया कोठारी

Web Title: The burden of the mother on the tiny creatures; The highest number of girls in the age group of 14 to 17 years is Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.