भिगवनमध्ये आरोग्य केंद्रावरच सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:55+5:302021-05-06T04:11:55+5:30
इंदापूर तालुक्यातील भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षापर्यंत २०० नागरिकांना लस देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे ...
इंदापूर तालुक्यातील भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षापर्यंत २०० नागरिकांना लस देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सकाळी ८ वाजल्यापासूनच नागरिकांनी याठिकाणी आपला नंबर लावण्यासाठी उपस्थिती लावली होती. मात्र, १० वाजून गेले तरी कोणीही आरोग्यसेवक डॉक्टर अथवा कर्मचारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे १० वाजता मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली.तसेच नंबर वरून नागरिक आपसांत वाद घालू लागले. याची माहिती पत्रकारांना मिळताच याठिकाणी भेट देत याबाबतची माहिती पदभार असणाऱ्या वैदकीय अधिकारी डॉ.गणेश पवार ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील गावडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना दिली. त्यावेळी तीनही अधिकारी यांनी याची दखल घेत कर्मचारी आणि डॉक्टर पाठविण्याची व्यवस्था करीत असल्याचे सांगितले. मात्र वेळेत कर्मचारी न आल्याने मोठ्या गोंधळाची परिस्थिती यावेळी निर्माण झाल्याने अखेर भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी पोलीस पथक पाठवून गर्दी कमी करण्याचे काम केले.
याबाबतची गटविकास अधिकारी विजय परीट यांना विचारल्यावर मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याबाबत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना ही बाब कळताच त्यांनी तातडीने आदेश देत आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर उपलब्ध केले.